
आयुष्य किती असावं ? प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतील.कुणी म्हणेल,साठ वर्षे बास झाली तर कुणी म्हणेल शंभरी गाठता आली पाहिजे. आणि एखादा तर विशीतच गळफास लावुन गेलेला दिसेल.सार्थ आयुष्य कुणाचं?
माऊली म्हणतात, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।तेणे मुक्ती चारी साधियेल्या।। आपण देवाच्या दारातच उभे आहोत याची कल्पना देवाला भजनारांनाही असेलच असं सांगता येत नाही.देव ज्यांना चालत नाही ते म्हणतील,आम्ही देव मानतच नाही तर त्याच्या दारपुढे उभं राहण्याचा संबंधच काय ? आम्ही देवाच्या नावानं कधी वर्गणी सुद्धा दिली नाही तर देवाच्या दारात क्षणभर सुद्धा उभं राहण्याचा प्रश्न फार दुरचा आहे.
सज्जनहो क्षणाक्षणानं जीवन संपत आहे. क्षणार्धात ते लोपही पावेल.थेंब थेंब पाणी पडुन तळं भरलेलं दिसतं पण ते रिकामं कसं झालं हे कळत नाही. तसच आमचं जीवन आहे. आम्हाला बाल्यावस्था, युवावस्था,प्रौढावस्था आणि वृद्धावस्था दिसते पण अनुभवास फार उशिरा येते.म्हणजे प्रौढत्व आलेलं कळत नाही तसं वृद्धत्व आलेलंही कळत नाही. अभी तो मै जवान हुँ।असं म्हणतही असेल कुणी.पण त्यानं सत्य बदलणार आहे का?प्रत्येक क्षण मृत्युकडे वाटचाल सुरु आहे.एकाच वाहनात बसुन ज्यांना भेटायला जायचय त्यांच्यासोबत प्रवास केला पण ओळख कधी झाली?त्यांना भेटल्यावर.मग किती पश्चाताप!किती हळहळ!पाच तास एकत्र प्रवास केला पण ओळख नसल्याने पुर्ण प्रवास व्यर्थ गेला.असं आपल्या आयुष्यात कधीतरी घडलं असेल.
माऊली म्हणतात, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ म्हणजे तो क्षण आहे. तो क्षण पकडता यायला हवा.अन्यथा सगळा जीवन प्रवास रिकामाच व्हायचा.आपण देवदारात उभे आहोत हे कळालं की जीवन सार्थ झालं.श्रद्धा,अश्रद्धाच्या पलिकडे जाता येईल तो धन्य.देवाचं द्वार म्हणजे मुक्तावस्थेकडे नेणारा आरंभ.मनुष्य देहाचं महत्त्व कळणारा क्षण.कितीही आयुष्य जगुन आनंदाने निरोप घेता येत नाही ही फसगतच नाही का?आपण मित्राकडे,नातेवाईकांकडे चार दोन दिवस जातो आणि आनंदाने निघतोही.कारण परत मागे जाण्यासाठी आपलं घर आहे आणि ते कुठे आहे हे माहीत असतं.तिकडे जाण्याचा मार्गही माहित असतो.आयुष्याला रामराम करताना असं घडत नाही.कारण निजघर माहित नाही.मृत्यू म्हणजे सर्वनाश हेच आम्ही ग्राह्य धरलेलं आहे.ते लौकिक अर्थाने खरही आहे. पण त्यानं सत्य बदलणार आहे का?
चार मुक्तींविषयी आपण नंतर केंव्हा तरी बोलु.त्या साधता येतील की नाही ? ती मुक्तावस्था कोणती?या चिंतनाकडे तेव्हाच जाता येईल जेव्हा तो क्षण पकडता येईल.त्यासाठी त्या पुरक अभ्यासाची गरज आहेच.अणुरेणुची टक्कर घडवण्यासाठी बिगबँग प्रयोग झाला.
१३.८ अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व एका बिंदूसमान होते. आकाराने अतिशय छोटे. या बिंदूचा स्फोट झाला आणि त्यातील सर्व द्रव्य अवकाशात फेकले गेले. त्यातूनच मूलकणांची निर्मिती झाली. स्फोटानंतर बिंदूचे प्रसरण होत गेले आणि प्रसरणाची प्रक्रिया चालूच राहिली. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार विश्व प्रसरणशील आहे. महास्फोट होण्याच्या आधी काय स्थिती होती, मुळात हा स्फोट झाला कसा आदी अनेक प्रश्न आजही उपस्थित केले जातात. विश्वाच्या निर्मितीबाबत ‘अनादि-अनंत’ हा दुसरा सिद्धांतही मांडला जातो. या सिद्धांतानुसार विश्व स्थिर आहे. त्याला सुरुवात नाही आणि त्यामुळेच शेवटही नाही. म्हणूनच या सिद्धांताला ‘अनादि-अनंत’ सिद्धांत म्हटले जाते.
पहिली टक्कर कुणी घडवली हा प्रश्न अनुत्तरित राहिला तरी त्याचा निर्माता नाकारणं हे सुज्ञपणाचं असेल का?आम्ही देवाच्या दारातच उभे आहोत हे सांगणाऱ्या अनंत खुणा आहेत.गरज आहे ते ओळखण्याची.नामचिंतनाने त्याचा आरंभ होतो आणि मुक्तीपदाने त्याचा शेवट होतो.
रामकृष्णहरी
from Parner Darshan https://ift.tt/3GApvRT