
मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येचा वाढता वेग पाहता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यातली रुग्ण संख्या २ लाखांच्या घरात जाईल. या गतीने राज्यातील रुग्णसंख्या जर ८० लाखांच्या घरात गेली तर होणारे मृत्यू ८० हजारांच्या घरात जातील, अशी धक्कादायक माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
व्हायरस जरी सौम्य असला तरी त्याच्या संसर्गाचा वेग भयंकर आहे. त्यामुळे तो अधिक लोकांना बाधित करेल. बाधितांची संख्या लाखाच्या घरात जाईल व होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कमी दिसली तरी तो आकडा मोठा असेल. या सूत्रानुसार अंदाजे ८० हजार मृत्यू होतील. तातडीने गर्दी करणे टाळले, खबरदारीचे उपाय केले तर बाधितांच्या संख्येत घट होईल व मृत्यूदेखील कमी होतील. पण, बेफिकिरी दाखवली तर ८० हजारांच्या घरात मृत्यू १५ दिवसांतही होऊ शकतात, अशी भीतीही पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा वेग प्रचंड आहे. त्या मानाने बेडची संख्या कितीही जास्त असली तरी वाढत्या रुग्णांना त्याचा किती उपयोग होईल, असा प्रश्न या पत्राने निर्माण झाला आहे.
कोणत्याही चर्चांवर जाऊ नका. जर लसीकरण झाले नसेल आणि सहव्याधी (अन्य आजार/कोमॉरबिडिटी) असतील तर ही लाटदेखील तेवढीच घातक ठरेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जास्तीतजास्त लसीकरण करून घ्या.
२२ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार मुंबई वगळता राज्यातील एकही जिल्हा कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णत: तयार नव्हता. १७ ठिकाणी किरकोळ दुरुस्त्या तर १६ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे सांगत अतिरिक्त मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले.ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड आणि अपेक्षित रुग्णवाढ याबद्दल याआधीच तपशीलवार माहिती सर्व जिल्ह्यांत दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सुविधा तातडीने तपासाव्या. गरज असेल तर नवीन व्यवस्था उभी करा. केंद्राच्या निर्देशानुसार ऑक्सिजनची प्राधान्याने व्यवस्था करा.६०% रुग्णांना सौम्य लक्षणे असतील. त्यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये भरती करू नका. नाहीतर, ज्यांना बेडची खरोखरच गरज आहे त्यांना ते मिळू शकणार नाहीत.
from https://ift.tt/3pKSIDu