
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना घडविणार्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज जन्मोत्सव. यानिमित्ताने त्यांच्या काही आठवणींना उजाळा देऊयात…
जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी त्यांना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. तसेच जिजाऊंनी युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.
जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.
शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. बलाढ्य विरोधक असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. त्यांनी स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. म्हणूनच तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, बहिर्जी, कावजी, नेताजी असे सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी तयार झाले. जिजाऊमातेनं शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर मातृप्रेम केले. म्हणून त्या स्वराज्यमाता आहेत.
त्यांनी शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य केले. शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय खऱ्या अर्थाने जिजाऊंना जाते. कारण त्यांनी शिवरायांना बालपणापासून तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट-किल्ले पायदळी घाला, शत्रुचा नि:पात करा, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले होते.
जिजाऊ माता संकटसमयी कधीही डगमगल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्या प्रयत्नवादी होत्या. त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत .
जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणार्या होत्या. त्यांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार केले. शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आली आहे. सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं, प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले. प्रतिकुल परिरिस्थितीत जिजाऊंनी हतबल,निराश न होता मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले. आजच्या महिलांनी जिजाऊंचे हे गुण आत्मसात केले तरच ती खरी जिजाऊ जयंती होईल…
from https://ift.tt/3qisatk