
मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकट काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिसांची ठाकरे सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर थट्टा केली आहे आहे. पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून सरकारने अवघे ७५० रुपये जाहीर केले. या तुटपुंज्या दिवाळी भेटीमुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे.
दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जात असतो. यापार्श्वभूमीवर इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून भरघोस दिवाळी भेट देण्यात आली. यात पालिका, बेस्ट कर्मचारी आणि इतर शासकिय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र मुंबई पोलिसांना मात्र ७५० रुपये दिवाळी भेट देऊन त्याची चेष्टाच केल्याची चर्चा पोलिस दलात आहे.
मुंबई पोलिसांना दिवाळी भेट म्हणून त्यांच्या नावे डेबिट व क्रेडिट कार्डवर ७५० रुपये (प्रति कर्मचारी) इतक्या रकमेची खरेदी विनामुल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांच्या पोलिस कल्याण निधीतून दिले जाणार आहे. पोलिस बांधवांना अवघे ७५० रुपये भेट स्वरूपात मिळत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत पोलिसांना विनामूल्य खरेदी करता येणार आहे. या भेटीत नेमके पोलिसांच्या हाती काय लागणार आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही.
यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या स्वाक्षरीच्या पत्रात या भेटीसंदर्भातील नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. रक्कम अवघी ७५० असली तरी नियम मात्र अत्यंत कठोर आणि कडक ठेवण्यात आले आहेत.पोलिसांनी आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ७५० रुपयांची खरेदी करायची आहे. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी झाल्यास वरची रक्कम पोलिसांना स्वतःच्या खिशातून भरावी लागणार आहे.
ही योजना फक्त मुंबई पोलिसांसाठीच असेल. इतर पोलिस दलातील कर्मचारी याचा लाभ घेऊन शकणार नाहीत, असे या पत्रकात म्हटले आहे.
from Parner Darshan https://ift.tt/3mvfWvH