माझ्या प्रिय मित्रांनो पहाटचिंतनातुन ग्रंथसंपदेतुन काही सुंदर गोष्टी मला गवसल्या आहेत.त्या सांप्रत जीवन सुखी करण्यासाठी उपयुक्त आहेत. या आपल्यासाठी मी अवर्जुन लिहित आहे. मला खात्री आहे, हे विचार आपल्या जीवनात नवी पहाट घेऊन येतील.काही पटलं नाही तर सोडून द्या. पण आवडलेलं जरूर आमलात येऊद्या. कारण त्याचा श्रोत माझे गुरुदेव आहेत.
आपल्यापैकी अनेकांची मुलं कुणी प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असतील.तर कुणी डिग्री, डिप्लोमा करत असतील. आपल्यापैकी अनेकजन नोकरी, व्यवसाय किंवा शेती करत असाल.पैकी अनेकजन अर्थिक सक्षम असाल,काहिंची परिस्थिती बऱ्यापैकी असेल,काहिंची तारेवरची कसरत असेल.
आपण सर्वांचं एकच ध्येय आहे,मुलांना शिक्षण देऊन सुशिक्षित करायचं,आणि चांगली नोकरी त्यांना मिळवून द्यायची,उद्योजक बनवायचं.बस्स…….
मग आपापल्या परिनं मुलांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असतो.त्यांना जादा तास, जिम, उत्तम खुराक,कपडे,आवडीचे पदार्थ, आवडीच्या वस्तू,आपली परिस्थिती असो अगर नसो सारंकाही नेटानं सुरु असतं.
खरं सांगा…खरच मुलांकडून आपली अंतिम इच्छा काय आहे?
अनेकजन म्हणतील,आपलं कर्तव्य आहे,ते केलच पाहिजे, उद्या मुलं त्याची जाण ठेवो अगर न ठेवोत.
आता अगदी खरं सांगा!आपण आपल्या मुलांना उच्चशिक्षित करुन चांगल्या नोकरीला प्राप्त करताना,चांगला बिजनेसमन बनताना पहाणं हे किती आनंदाचं?ते शब्दात मांडताच येणार नाही. एखाद्या मुर्तीकाराने अनेक वर्षांच्या अथक कारागिरीनं सुंदर मुर्तीचं निर्माण करावं,आणि त्या मुर्तीचं देवालयात जाणं आणि समस्त जगतानं तिचं दर्शन घ्यावं हे कोण आनंदाचं!!!
मुलांचं आयुष्य घडवताना आपण समर्पित झालेलो असतो.आपला हाच अनुभव असेल,आपल्यावर नितांत प्रेम करणारी पत्नी पुत्रप्राप्ती नंतर आपल्यापेक्षा मुलांकडेच तिच्या प्रेमाचा ओढा जास्त असतो.ती मुलांसाठी समर्पित झालेली असते.मुलं कितीही मनाविरुद्ध वागली तरी आपण रागवावं आणि बायकोनं त्यावर पांघरूण घालावं.आपणही या क्रियेनं सुखावतच असतो बरका!
आता थोडं गंभीर विषयावर बोलतो.
मुलं मोठी झाली. आता लग्नाचं वय झालं.मग एका नव्या पर्वाला सुरुवात.काती धामधूम किती पळापळ.माझ्या मुलामुलींचा विवाह किती अदभूत करता येईल यावरच सारं लक्ष केंद्रित.
सारंकाही अलबेल झालं.आता प्रपंच पुर्णत्वास गेल्याची भावना मनात निर्माण न झाली तरच नवल.आता नवीन सदस्य घरात आला….सुनबाई.
ती तर सारा मायापाश तोडून आली आहे. तिला सामावून घेणं साऱ्या परिवाराची जबाबदारी. हे शिवधनुष्य पेलण्याहुन कठीण आहे.आता हे लक्षात ठेवा. मुलाच नवीन आयुष्य फक्त, फक्त आणि फक्त पत्नीसहच सुरू होतं,हे का मी सांगण्याची गरज आहे?आपण हे अनुभवलं आहे.
आपण सुनेला किती प्रेम देता,हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे.
आता थोडं मागे येऊया.तुमच्या घरात तुमचे आईबाबा आहेत का?तुमच्या आईचे आणि पत्नीचे संबंध कसे आहेत?तुमच्या आईबाबांचे आणि तुमचे संबंध कसे आहेत?
याची उत्तरं समाधानकारक असतील तर चिंता करण्यासारखं काही नाही. पण जर वरील प्रश्नांची उत्तरं समाधानकारक नसतील तर आता इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.
“थिअरी ऑफ कर्मा” कर्माचा सिध्दांत.
सिध्दांतावर मी आता बोलणार नाही. पण इतकच म्हणेल,मुलांकडून तुमच्या अपेक्षा काय आहे?आम्ही आमचं कर्तव्य केलं,आता मुलं कशी वागतील हे त्यांचं त्यांच्याकडे म्हणून स्वतः च्या कर्माला दोष देत रहाल?
मुलांना उच्चशिक्षण देणं ही काळाची गरज आहे. पण सुसंस्कारीत करायला कमी पडलात तर मुलांचं प्रेम परत माघारी फिरेल कि नाही हे सांगता येत नाही. तिन्ही सांजेनंतरचं जीवन परिपक्वतेचं आहे.कैरी कितीही आंबट असली तरी ती पिकल्यावर गोड होते.आपली अखेरची सांज गोड व्हायला हवी ना?
मग अजुनही वेळ गेलेली नाही. सुनेला मुलीसारखं प्रेम द्या. तुमच्या बायकोनं तुमच्या आईबाबांना तुमच्याहुन जास्त प्रेम दिलं पाहिजे. ही स्थिती निर्माण करणं हा फार मोठा पुरूषार्थ आहे.बाहेर कितीही मैदानं मारली तरी ती व्यर्थ आहेत.पुत्रप्रेमानं वंचित झालेली भलीभली माणसं अकाली संपलेली मी पाहिली आहेत. तुमच्या आईबाबांचा तो अधिकार आपण हिरावला असेल तर……..पुनरावृत्ती होणार….
कुटुंब भौतिक सुखानं आनंदेल पण क्षणिक.प्रेमानंदानंच ते परिपूर्ण होतं.चला …
मानवीमुल्य आणि मानवधर्म संस्कारांचं पालन करूया आणि अखेरच्या आनंदसांजेची तजवीज करुया.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/KOgFcb9

By News

Leave a Reply

Your email address will not be published.