
जेजुरी : येथील खंडोबा देवाची पौष पोर्णिमेनिमित्त यात्रा सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीने दरवर्षी जेजुरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार सुरू झाला आहे. या बाजारासाठी अठरा पगड जाती जमातीतील समाज बांधव सहभागी झाले आहेत. शुक्रवार पासूनच या बाजारात गाढवांची खरेदी विक्री सुरू झाली असून 20 हजार रुपयांपासून ते 45 हजार रुपये पर्यंत एका गाढवाला किंमत मिळत आहे. यंदा बाजारात दीड ते दोन कोटींची उलाढाल झाली. परंतु कोरोनाच्या भीतीचे यंदा बाजारावर संकट आल्याने बाजारात गाढवांची आवक कमी दिसून आली.
जेजुरीच्या बंगाली मैदानात अनेक पिढ्यांपासून गाढवांचा बाजार भरतो. ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे. अशा समाजातील नागरिक गाढवांच्या खरेदी विक्री व कुलदैवताच्या दर्शनासाठी प्रत्येक पौष पौर्णिमेला जेजुरीत येतात. वडार, बेलदार, वैदू, कैकाडी, गारुडी, कुंभार, भातुकोल्हाटी, परीट आदी अठरा पगड जातीजमातीचे, बलुतेदार समाजाचे नागरिक या यात्रेत सहभागी होतात.
जेजुरी, मढी व, माळेगाव येथे दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. जेजुरी येथे दोन ते तीन दिवस चालणाऱ्या गाढवांच्या बाजारासाठी गुजरातमधील अमरेली, सौराष्ट्र या भागातून येथे सुमारे सव्वाशे गाढवे विक्रीसाठी आली आहेत. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, परभणी, सातारा भागातून सुमारे सहाशेहून अधिक गाढव दाखल झाले आहेत.
गाढवांची किंमत त्यांची वये व दातावरून ठरत असते. दात नसलेले कोरा, दोन दाताचे दुवान, चार दाताचे चवान तर संपूर्ण दात असलेल्या गाढवाला अखंड म्हणून ओळखले जाते. गावठी गाढवांची 10 हजार ते पंचवीस हजारापर्यंत विक्री होत आहे तर काठेवाडी गाढवांना चांगली किंमत असून पंचवीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत विक्री झाली.
from https://ift.tt/3GKQA4w