
देविदास आबूज
पारनेर : विखे पाटलांचा पारनेर दौरा आणि राजकारणात उलथापालथ हे समीकरण अगदी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून ठरलेलेच ! प्रवरेचा राजकीय आदेश तर या तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो याचा प्रत्यय काल देखील विखे पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीतील खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या दौऱ्यात आला. केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेच्या शिबिराचे निमित्त असले तरी या दौऱ्याला मात्र अनेकअर्थी राजकीय किनार होती ही बाब लपून राहिलेली नाही. राज्यात शिवसेना आणि भाजपा एकमेकांना पाण्यात पाहत असले तरी पारनेर तालुक्यात निवडणूकीत भाजप शिवसेना युती कायम राहणार असल्याचे सूतोवाच दस्तुरखुद्द भाजपाचे खासदार डॉ.विखे पाटील यांनी जाहिरपणे करून राज्यात खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना चिमटा काढण्याची संधी त्यांनी सोडली नाही. दरम्यान या दौर्यात आणि वयोश्री शिबिराच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांना मात्र राजकीय बळ मिळाल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार राबवीत असलेल्या वयोश्री योजनेच्या दक्षिण मतदार संघातील शिबिराचा समारोप सोमवारी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे झाला. याआधी तालुक्यातील विविध गावात विखे पाटील यांच्या उपस्थितीत विकास कामांचे भूमिपूजनही करण्यात आले. टाकळी ढोकेश्वर येथे झालेले वयोश्री शिबिर हे देशात रेकॉर्ड मोडणारे ठरणार आहे.यापूर्वी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 26 हजार लाभार्थ्यांना साहित्य वाटप केल्याने त्यांचा विश्वविक्रम झाला होता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आली होते. हे रेकॉर्ड नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाने मोडीत काढले असून केवळ एक महिन्याच्या अवधीत सुमारे 34 हजार लाभार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने या शिबिराचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले होते. प्रचंड गर्दी होऊनही प्रत्येक लाभार्थ्यांना आपली नोंदणी करता आल्याचे समाधान मिळाले. एकाच दिवसात सुमारे पावणेचार हजार वयोवृद्ध लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली. या लाभार्थ्यांना नेण्या आणण्याची वाहतूक व्यवस्था देखील विखे पाटील फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली होती.अगदी चहा,नाश्ता ते मिष्टान्न भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. केवळ एक महिन्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे समाधान डॉ.विखे यांनी व्यक्त केले तर नोव्हेंबर – डिसेंबर या कालावधीत 78 टक्क्यांपेक्षा जास्त टक्केवारी असणाऱ्या दिव्यांगाची नोंदणी करून त्यांना मोफत मोटर सायकल देण्यात येणार असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.
पारनेर चा कालचा दौरा सर्वच अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील रस्त्याच्या भूमिपूजनाचा पासून विखे पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. या दौर्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बरोबरच शिवसेनेचे सभापती तालुकाप्रमुख हे देखील सहभागी झाले होते याचा आवर्जून उल्लेख करीत विखे पाटील यांनी शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी यांच्या कारकीर्दीतील विकास कामांचे कौतुक करीत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. राज्यात आगामी निवडणुकांमध्ये कोणाचीही आघाडी होऊ द्या मात्र पारनेरमध्ये भाजपा-शिवसेनेचीच युती असणार असे सूचक विधान खा. सुजय विखे यांनी केले. आपल्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष म्हणून पारनेर तालुक्यात शिवसेनेने आपणास मोठी मदत केल्याचेही त्यांनी सांगितले. माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या कार्याचेही विखे पाटील यांनी कौतुक केले.
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीकेची संधी सोडतील ते विखे पाटील कशाचे ? त्यांनी आमदार लंके यांचा नामोल्लेख टाळत टीकेचे लक्ष्य केले. सत्तांतर करणे फार सोपे असते मतदान करताना कोणाला निवडून आणता त्याचा आपल्या मतदार संघावर काय परिणाम होतो हे देखील महत्त्वाचे असल्याचे सांगत खा. विखे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली
तत्कालीन खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील व तत्कालीन आमदार स्व.वसंतराव झावरे पाटील हे दोघेही काँग्रेस पक्षात असले तरी त्यांचे राजकीय हाडवैर काय होते हे जिल्ह्याला ठाऊक आहे मात्र, अलीकडच्या काळात बदलत्या राजकीय समीकरणानुसार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खासदार डॉ.सुजय विखे आणि झावरे यांची चांगलीच नाळ जुळली आहे त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात झावरे हे अग्रभागी असतात झावरे यांच्याकडे आज कोणतीही सत्ता नसली तरी विकास कामांबाबत सुजित झावरे यांनी विखे-पाटील यांच्याकडे टाकलेल्या शब्दाला किंमत आहे याचाच प्रत्यय तालुक्यातील विकास कामांमध्ये येत आहे.
कालचा दौरा देखील सुजित झावरे यांना राजकीय पाठबळ मिळवून देणारा ठरला.टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट हा सुजित झावरे यांचा बालेकिल्ला असल्याने आगामी निवडणूक लक्षात घेता व वयोश्री योजनेचे शिबिर तालुकास्तरीय असले तरी ते जाणीवपूर्वक टाकळी ढोकेश्वर येथे घेण्यात आले.तसेच ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील विकास कामांचे भूमिपूजनही कालच्या दौऱ्यात करण्यात आले. या शिबिरासाठी वृद्ध व्यक्तींची वाहतूक करण्यासाठी विखे फाउंडेशनच्या वतीने 52 बस देण्यात आल्या होत्या. पैकी यातील 40 बसचे नियोजन एकट्या सुजित झावरे यांच्याकडे होते.प्रामुख्याने ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील गावांमधून या बसच्या माध्यमातून वृद्धांना टाकळी ढोकेश्वर येथे आणण्यात आले. यावरून या शिबिरात सुजित झावरे यांचाच वरचष्मा असल्याचे दिसून आले.
या शिबिराच्या माध्यमातून सुमारे पावणेचार हजार वयोवृद्धांना साहित्याचा मोठा फायदा तर होणार आहेच परंतु याचा राजकीय फायदा सुजित झावरे त्यांना निश्चित होणार आहे.याविषयी कोणतीही राजकीय प्रतिक्रिया व्यक्त न करता विखे पाटील यांच्या माध्यमातून वयोवृद्धांच्या पुण्याईचे काम घडत असून त्यांचा सहस्त्र आशीर्वाद आम्हास मिळाला आहे त्यातूनच चिरंतर ऊर्जा निर्माण होईल अशी प्रतिक्रिया सुजित झावरे यांनी व्यक्त केली.दरम्यान् आगामी काळात प्रवरेच्या यंत्रणेचा राजकीय फायदा सुजित झावरे यांना मिळणार हे मात्र निश्चित आहे.
from Parner Darshan https://ift.tt/3nVtLmO