मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 
डॉ.अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.
“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असे अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
“कलाकार म्हणून माझ्याकडे ही भूमिका आली होती आणि ती मी साकारली. त्या विचारधारेचा जेव्हा मी प्रचार आणि प्रसार करतो आणि माझी राजकीय विचारधारा ही वेगळी गोष्ट आहे. व्यक्ती म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचा मी आदर करतो. चार पाच वर्षापूर्वी केलेला सिनेमा आहे आणि तो बाहेर आल्यानंतरच त्यामध्ये काय आहे हे मला कळणार आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कलाकार आणि राजकीय प्रतिमा या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे,” असे डॉ.अमोल कोल्हे म्हणाले.
“राजकीय भूमिका घेणे हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे. माझ्या पक्षातल्या लोकांना याला विरोध केला तर वैशम्य वाटण्याचे कारण नाही. कारण ही राजकीय भूमिका आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींना हे मी कळवलेले आहे,” असे कोल्हे यांनी म्हटले.

from https://ift.tt/35f1CkZ

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *