खासदार डॉ.अमोल कोल्हे गांधीचरणी नतमस्तक !

Table of Contents

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला (शनिवारी) आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आदरांजली वाहिली. यावेळी आत्मक्लेश करतानाच नथुराम गोडसे याची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्यात त्यांच्याप्रती दिलगिरीही डॉ.कोल्हे यांनी व्यक्त केली. 
‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटात मी नथुराम गोडसेची भूमिका केली म्हणजे मी ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही,’ हे स्पष्ट करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, एखादे नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटल्या, ते पाहता गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे.
महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रति मी दिलगिरी व्यक्त करतो, असे डॉ.अमोल कोल्हे यांनी पुढे नमूद केले.
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित होताच वादळ उठले आहे. डॉ.अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसने आक्रमक होत या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास बंदी घालावी, अशी मागणीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. ‘अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका केली असली तरी या कृतीतून नथुराम गोडसेचे समर्थन हे आलेच. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,’ अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या सर्वात आपले मत मांडले. ‘अमोल कोल्हे यांनी ही भूमिका एक कलावंत म्हणून केली आहे. कोल्हे यांनी ही भूमिका ज्यावेळी केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. कलावंत म्हणून त्यांनी ही भूमिका केली म्हणजे याचा अर्थ त्यांनी गांधीजींच्या विरोधात काही केले असा होत नाही. नथुराम गोडसेने जे केले, ते सगळ्या देशाला माहीत आहे. कलावंत आणि देशातील इतिहास या दोन्ही गोष्टींना समोर ठेवून आपण बघितले पाहिजे’, असे शरद पवार म्हणाले.या सर्व घटनाक्रमानंतर आता आत्मक्लेश करत अमोल कोल्हे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

from https://ift.tt/Glbz4yITW

Leave a Comment

error: Content is protected !!