
पारनेर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या बदलत्या काळाला अनुसरून कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची रचना करणे ही काळाची गरज बनली असल्याचे मत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष,माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी व्यक्त केले.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज राजर्षी शाहू सभागृहाचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव अॅड.विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी श्री.झावरे बोलत होते.
माजी आमदार श्री. झावरे म्हणाले की,नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना प्राधान्य राहणार असून त्यानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र इ. विद्याशाखातील विद्यार्थी विविध विषय घेऊन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिप्लोमा,पदविका, पदवी प्राप्त करणार आहेत. बदलत्या काळाच्या अनुषंगाने आजच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यालय पातळीवर आगोदरपासूनच सुरु केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा होतकरू, परिस्थितीची जाणीव असणारा, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणारा असतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना उद्याच्या काळात रोजगार मिळावा त्यांना त्यांच्या आयुष्यात उभे राहता यावे. याचा सर्वांगीण विचार करून अभ्यासक्रम असायला हवा असेही श्री.झावरे म्हणाले.
संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी बारकाईने अभ्यास करून शिक्षणात होणारे नवीन बदल स्वीकारायला हवेत. मुलांनी केवळ शिकणेच महत्त्वाचे ठरणार नाही तर कसे शिकायचे हे शिकणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. तार्किक विचार कसा करायचा, समस्या कशा सोडवायच्या, कल्पक आणि बहुशाखीय कसे व्हायचे, नाविन्यपूर्णता कशी आणायची, जुळवून कसे घ्यायचे आणि नवनवीन व बदलणाऱ्या क्षेत्रातील नवीन सामग्री कशा प्रकारे आत्मसात करायची या दिशेला वळले पाहिजे. शिक्षण अधिक अनुभवात्मक, सर्वसमावेशक, एकात्मिक, जिज्ञासू, संशोधन केंद्रित, लवचिक आणि अर्थातच आनंददायक होण्यासाठी अध्यापनशास्त्र उत्क्रांत होण्याची गरज आहे.
या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर,उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, डॉ. रघुनाथ नजन, प्रा. ज्योत्स्ना म्हस्के, ठकाराम बुगे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
from https://ift.tt/53Ue8wC