
शिरूर : राज्यातील आजी माजी मंत्री, आमदार, खासदार यांची कोरोना पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. काल शनिवारी संध्याकाळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिली.
काल सायंकाळी तिरुपती बालाजी येथून विमानाने देवदर्शन घेऊन परतल्यावर त्यांना थकवा जाणवत होता त्यानंतर त्यांनी तातडीने कोरोना टेस्ट करुन घेतली ती पॉझिटिव्ह आली.
माझी तब्येत ठीक असून मला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस विश्रांती घेणार आहे. मात्र माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी, असे आवाहन आढळराव पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, आज लांडेवाडी येथे होणारा नियोजित जनता दरबार रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आता कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने विविध निर्बंध लादूनही नागरिकांकडून मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
from https://ift.tt/3HMy5gf