
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनने जगभरात अनेक देशातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. या व्हेरिएंटमुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमीक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने लोकांमध्ये पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. या व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीची बैठक बोलावली होती.
महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) कोरोना टास्कफोर्स, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ओमीक्रॉनच्या नव्या धोक्याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा कितपत प्रभाव पडेल या प्रश्नावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे बोलताना महत्त्वाचे विधान केले आहे. सध्या देशात आणि महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा परिणाम दिसत नाही. दुसरी लाट डेल्टा व्हेरिएंटमुळे आली होती. तिसरी लाट या नव्या व्हेरिएंटमुळे येण्याची शक्यता आहे. पण आपण वेळीच त्याला रोखलं तर चिंता करण्याची गरज नाही. परंतु सतर्क राहणं गरजेचे आहे असे टोपे म्हणाले.
ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता राज्य सरकार १ डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करणार का? यावर राजेश टोपे म्हणाले की, १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य मंत्रालयाला तसा प्रस्ताव पाठवला. त्यावर हिरवा कंदील देण्यात आला. सध्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता नाही. आज (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होईल. त्यामुळे पुढील निर्णय घेतला जाईल असे संकेत राजेश टोपेंनी दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, ओमीक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रमित करत आहे. या व्हेरिएंटबाबत आणखी अभ्यास सुरु आहे. त्याबाबत काही माहिती समोर आली तर त्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यात येतील. आम्ही सतर्कता बाळगून आहोत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. कठोरपणे या प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्यात येईल. परंतु अद्यापही या देशातून येणाऱ्या उड्डाणावर आपण बंदी आणली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहून कळवलेही आहे अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
from https://ift.tt/3d0iEDG