उन्हाळा जवळ आला की सगळ्यांची माठ आणण्याची लगबग सुरू होते. फ्रिजमधल्या गार पाण्यानी तात्पुरते तहान भागत असली असले तरी माठातल्या पाण्याची सर कशालाच येणार नाही. मात्र माठ आणताना आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. जसे की, काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? की नव्याने बाजारात आलेले पांढऱ्या रंगाचे डिझायनर माठ चांगले? याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात…
1. काळ माठ : पूर्वीपासून आपल्याकडे काळ्या मातीचे माठ वापरले जात. या काळ्या मातीत पाणी जास्त चांगले गार होत असल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. कोणत्याही माठातून पाणी जितके जास्त पाझरेल तितके पाणी गार होण्याचे प्रमाण अधिक असते. काळी माती काळ्या खडकापासून तयार केली जाणारी आपल्याला सामान्यपणे दिसणारी आणि सगळीकडे उपलब्ध असणारी माती आहे. ही माती नैसर्गिकरित्या चांगली असल्याने यामध्ये पाणी अधिक गार होते. त्यामुळे उन्हाळ्यात माठ खरेदी करायचा विचार करत असाल तर काळया मातीच्या माठाचा विचार कराच.
2. लाल माठ : गेल्या काही वर्षांपासून लाल रंगाच्या माठ तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यातही वेगवेगळ्या घाटाचे, डिझाईन असलेले, झाकण असलेले, नळ असलेले बरेच माठ दिसतात. या माठांची किंमत काळ्या माठांपेक्षा तुलनेने थोडी अधिक असते. लाल माती ही साधारणपणे कोकणातून मिळते. तसेच विटा ज्या मातीपासून तयार केल्या जातात, ती लाल माती यासाठी वापरली जाते. तुम्हाला साधारण गार पाणी आवडत असेल तर तुम्ही या माठाचा आवर्जून विचार करा.
3. पांढरा माठ : गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारचे पांढऱ्या मातीचे माठ बाजारात पाहायला मिळत आहे. हे माठ दिसायला आकर्षक असले तरी त्यातील पाणी म्हणावे तितके गार होत नाही. या माठांनाच चिनी मातीचे माठ असेही म्हटले जाते. एका माहितीनुसार, या मातीमध्ये काही प्रमाणात सिमेंट मिक्स केलेले असण्याची शक्यता असल्याने ते म्हणावे तितके गार होत नाही. नैसर्गिक मातीच्या तुलनेत या माठात पाणी अधिक गार होत नाही. म्हणून हा माठ म्हणावा तितका फायदेशीर नसल्याचे बोलले जाते. हे माठ विशेषतः मध्यप्रदेश किंवा इतर राज्यांतून आल्याने त्याची किंमत इतर माठांपेक्षा अधिक असते.
from https://ift.tt/a8t54oy