
शिरूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शिरूर तालुक्यातील कारेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील पेठ प्रादेशिक येथील नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पेठ प्रादेशिक योजनेसाठी पंचवीस कोटी अकरा लक्ष अडतीस हजार रुपयांचा आणि कारेगाव योजनेसाठी तेहतीस कोटी सव्विसलक्ष सत्यऐंशी हजार रुपयांच्या निधीस दि. 27 जानेवारीच्या शासन निर्णयाव्दारे मंजूरी देण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सन 2038 पर्यंतची संभाव्य लोकसंख्या लक्षात घेऊन त्या त्या गावातील वाड्या वस्त्यांना नळ पाणी पुरवठ्याव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाने निर्णया घेतला आहे त्यानुसार राज्यातील विविध गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने सातगांव पठारावरील पेठ, कुरवंडी, दस्तुरवाडी (निघोटवाडी), कोल्हारवाडी, थुगांव, भावडी, कारेगांव, पारगांव तर्फे खेड अशा एकूण आठ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या योजनेच्या आराखडयासाठी त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती तसेच ग्रामस्थांची देखील चर्चा केली होती. या गावांना नळाव्दारे पाणी पुरवठा होणार असल्याने पाण्याचा प्रश्न दुर होईल असा विश्वास गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
from https://ift.tt/33ZpFnB