
माऊली म्हणतात, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला।काय उणे तया सांगा जो जी।।
कल्पतरु म्हणजे काय? कुणी पाहिलाय?याची ठळक उत्तरं आमच्याकडे नाहीत. मनात जी कल्पना येईल त्याची प्राप्ती करून देणारा वृक्ष म्हणजे कल्पतरु.तो कुणी पाहिलाय का? त्याचही उत्तर नाहीच आहे.मग हा वृक्ष आहेच की नाही? हे विधान माऊलींचं आहे म्हणजे तो असलाच पाहिजे.
मनोमय कोशाशी संबंधित हा आहे. जसं आपण मागच्या भागात पाहिलं की नाक,डोळे,कान या ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी आकाश तत्वाचं प्राबल्य आहे.याच्याही वर जे आहे,ज्यामधे मेंदु आहे.तो म्हणजे आमच्या डोक्याचा भाग.मेंदूचा आकार जर आम्ही पाहिला तर तो बरोबर बहरलेल्या वृक्षासारखा दिसतो.सज्जनहो हाच कल्पवृक्ष आहे. इथे मन,बुद्धी आणि चित्ताविष्कार आहे.चांगल्या वाईट विचारांचं निर्माण येथे आहे.जशी विचारांची धारणा असेल तसं जग प्राप्त होतं.
चोरांशी चोरांची,सज्जनांची सज्जनांशी आणि विद्वानांची विद्वानांशी भेट घडवून देण्याची शक्ती याच कल्पतरुत आहे. पण आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला अशी अवस्था आमची होते आहे.आपल्याला बसायला वाहन मिळालं,त्यात इंधनही मोफत भरुन मिळालं तर इच्छा नसताना फिरण्याचा मोह होणारच ना?अशीच आमच्या मनोमयकोशाची अवस्था आहे.
मनात काय विचार येत नाहीत?तो मनोरथ कुठं म्हणून जात नाही?अस्थिरतेचं कारणच हे आहे. त्याला फिरण्यासाठी लागणारं इंधन मोफत उपलब्ध असल्याने अधिकार नसलेल्या गोष्टींचीही स्वप्न इथं पाहिली जातात.भरकटण्याची इथं पुरेपूर व्यवस्था आहे. वापर यथायोग्य करता येणं हे खरं कौशल्य आहे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/I96rPZ4