
पारनेर : तालुक्यातील कर्जुले हर्या येथील भगवान श्री.हरेश्वर महाराज मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी ‘हर हर हरेश्वर’चा गजर करीत मोठी गर्दी केली होती. ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. तसेच विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची स्थापना देखील यावेळी करण्यात आली.
गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. कर्जुले हर्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भगवान श्री. हरेश्वर महाराजांच्या मंदिराच्या जिर्णोद्धार केले आहे. अनेक दिवसांपासुन हे काम सुरू आहे. मंदिर परिसरात मोठे उद्यान देखील उभारण्यात आले आहे.
भगवान श्री. हरेश्वर महाराजांच्या मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमानिमित्त बुधवारी सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती आणि नवीन कलशाची ढोल-ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धान्याधिवासाचा कार्यक्रम पार पडला. गुरूवारी सकाळी गणेश पूजन, स्वस्तिवाचन, मातृकापूजन, मुर्तीला जलाधिवास, मंगलस्नान, होमहवन विधी आणि त्यानंतर नवीन कलशाचे पूजन करून कलशारोहण कार्यक्रम पार पडला.
ह.भ.प. प. पू. गुरूवर्य डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुरूवर्य ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हरीकिर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्य्रकमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
from https://ift.tt/WaV9UKC