
मुंबई : पारनेर तालुक्यातील वन विभागाच्या कामांसंबंधी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पारनेर -नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आज (गुरूवारी) विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.यावर आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर वन मंत्र्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा आमदार लंके यांनी विधानभवनाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
एका बाजूला विरोधी पक्ष सरकारवर आरोप करून अडचणीत आणण्याची व्यूहरचना करीत आहेत. अशातच आता एका सरकारी विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार करून सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादीच्या आमदारानेच सरकारला धारेवर धरल्याचे चित्र आज पहायला मिळाले. पारनेर तालुक्यात वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांत सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आ.लंके यांनी केला आहे.
पारनेर तालुक्यातील मातीनाला बांध व गॅबियन बंधार्यांची कामे करताना नियमानुसार निविदा प्रसिद्ध करणे गरजेचे होते. तसे न करता सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच अतिरिक्त कार्यभार असलेले वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी नियमांचे पालन केले नाही. मनमानी पद्धतीने कामांचे वाटप केले आहे. गॅबियन बंधारे ज्या मजुरांनी तयार केले, त्या मजुरांच्या नावावर मजुरी न देता वेगळ्याच मजुरांची नावे वापरून बिले काढली आहेत,असा आरोप आ.लंके यांनी केला आहे.
दरम्यान्,यावर वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आठ दिवसांत चौकशीचा आदेश दिला आहे. मात्र, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वनमंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा लंके यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.
from https://ift.tt/kAyNbKF