लहान बाळाला हसवण्यासाठी आम्ही लहान होतो,बालचाळे करतो,बोबडे बोलतो. बाळ हसलं की भरुन पावतो.ते निरागस हास्य मोठ्यांमधे फारच भाग्याने पहायला मिळतं.आपल्याकडे पाहुन कुणी हसलं की नाना शंकाकुशंका तयार होतात.हा हसण्याचा प्रकार कोणता?याचा शोध घ्यावा लागतो.हे हसणं कुच्छित होतं,छद्मी होतं,बेगडी होतं,हिनवण्यासाठी होतं की सहज होतं?यावर विचार करावाच लागतो.पण एखाद्याचं हसणं आम्हाला आनंद देत असेल किंवा आपलं हसणं दुसऱ्यांना आनंद देणारं असेल तर जीवन योग्य सात्विक सुगतीने चाललं आहे असं म्हणता येईल.
मनातुन हसणं पार विसरून गेलो आहोत आम्ही. हसणं आणि हसवता येणं हे दैवी गुण आहेत.पण दुर्दैवाने आमचं हसणं विषारी होत चाललं आहे.
समर्थ रामदास म्हणतात,
स्वदुःखे झुरे अंतरी।
आणि परदुःखे हास्य करी।
तयास प्राप्त यमपुरी।
राजदूत ताडिती।। आमचं हे असं चाललं आहे. आमचं दुःख कुणाला कळु नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.आतल्या आत झुरणं मात्र चालु आहे.दुसऱ्याचं दुःख पाहिलं की हसावं वाटणं हेच आमच्या फजितीचं कारण आहे.त्याने आमचं आपोआप हसं होणार आहे.आमचं हसु होऊ नये यासाठी सरळ आहे तसं जगता आणि वागता आलं तर नितळ हसता येईल व हस्याचा अनुभवही घेता येईल.
पितामह भिष्म शरपंजरी पडलेले असताना श्रीकृष्णांच्या सुहास्य वदनाकडे पाहिल्यावर सहस्त्र बाणांच्या वेदना कुठल्या कुठे नाहिशा झाल्या.त्यांनी पांडवांना उपदेश केला हा उपदेश भागवतात भिष्मगीता म्हणून प्रसिद्ध आहे.यावेळी पितामहांनी धर्माविषयी भाष्य केले.धर्म, अधर्म, राग-वैराग्य, दान धर्म, राज धर्म, स्त्री धर्म आणि भगवत धर्मची सतव्याख्या सांगितली.
पितामह हा उपदेश सांगत असताना द्रोपदीला हसु आलं.हे अप्रस्तुत होतं.सर्वांसमोर द्रोपदीचं हे हसणं पितामहांना सहस्त्र बाणांच्या वेदणेहुनही भयंकर वाटलं.त्यांनी द्रोपदीला हसण्याचं कारण विचारलं,तेव्हा द्रोपदी म्हणाली,”पितामह तुम्ही सध्या सांगत असलेला उपदेश उद्धार करणारा आहे,श्रेष्ठ आहे यात शंकाच नाही. पण भरसभेत दुर्योधनानं माझं वस्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही राजदरबारात पहिल्या क्रमांकाच्या आसनावर बसला होतात,तेव्हा हे तत्वज्ञान तुम्हाला आठवलं नाही का?”या द्रोपदीच्या उत्तरानं पितामह निरुत्तर झाले.
सज्जनहो भगवंताच्या एका स्मितहास्यानं मृत्यू शय्येवर पडलेल्या पितामहांना नवसंजीवनी मिळाली,दुर्योधनाचं अन्न खाऊन केलेल्या चुकांचं पाप अर्जुनाच्या बाणांनी बाहेर काढलं,रक्ताचा प्रत्येक थेंब ते पाप शरिरातुन बाहेर काढतोय अशी भावना पितामहांनी व्यक्त केली.इतक्या श्रेष्ठ व्यक्तीचं मृत्युसमयी द्रोपदीकडुन हसं झालं.तिथं आमची काय कथा आहे?चला मनापासून हसुया,नितळ हसुया,सात्विक हसुया.आमचं हसणं दुसऱ्यासाठी गुलाबपुष्प ठरो,संजीवनी ठरो.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3FPssgo

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *