आपले तेच जास्त जवळचे मित्र असतात जे सतत आपल्या वागण्याचं समर्थन करतात.आपली सतत वाहवा करतात.पण जर कुणी आपला दोष दाखवला तर ते आपल्याला अजिबात आवडत नाही.आपण त्या दोषांवर चिंतन करण्याऐवजी दोष दाखवणाराचेच दोष शोधतो आणि उलट त्याला दुषण देतो.दोष दाखवणाराचा रागही येतो.
तुकोबाराय म्हणतात, अवगुणांचा त्याग नाही।खवळे पाहे उपदेशी।।वास्तविक आपल्या चुका दाखवणारा सतत आपल्या जवळ असला पाहिजे.त्याशिवाय सुधारणा शक्य नाही. आपल्या दृष्टीने बरोबर वाटणाऱ्या गोष्टी चुकिच्याही असु शकतात.दोषमुक्त जीवन असुच शकत नाही. सुक्ष्मातीसुक्ष्म कारणाने दोष उत्पन्न होतातच.

तुकोबाराय म्हणतात, कागाचिये विष्टे जन्म पिंपळाशी।पांडव कुळाशी पहाता दोष।।
या पृथ्वीवर प्राणवायूचं अस्तित्व टिकवण्याची सर्वात मोठी जबाबदारी निसर्गाने पिंपळ वृक्षावर दिली आहे.पिंपळ वृक्ष किती महत्वपूर्ण आहे याचं चिंतन आपण मागील भागात केलं आहे.
भगवान बुद्धांना याच वृक्षाखाली बसून ध्यानधारणा करत असताना सत्यबोध झाला म्हणून याला बोधीवृक्ष म्हटलं जातं.पण या महान वृक्षाचा जन्म कावळ्याच्या विष्ठेतून व्हावा हा दोषच नाही का? तसच महाराज म्हणतात, पांडवप्रताप महान आहे. त्यांची कर्म श्रेष्ठ आहेत पण कुळाकडे पाहिलं की दोष आहे. कुंती कुमारीका माता आहे,हा दोषच आहे. पण हे ही लक्षात घेतले पाहिजे की मनुष्य कर्माने श्रेष्ठ होतो.जो स्वतःच्या दोषांवर काम करतो तो श्रेष्ठ होतो.
माझे गुरुदेव म्हणतात,आपलं कमीपण सांगणारं तोंड आणि कमीपण ऐकणारे कान आपल्याकडे असले पाहिजेत.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की गुरुदेवांनी हा संस्कार माझ्यावर केला त्यामुळे माझ्या आयुष्यातील काळ्या बाजुंवरही व्याख्यान,प्रवचनात मी बिनधास्त बोलु शकतो.त्यामुळे मला खूप हलकं झाल्यासारखं वाटतं.चुका सुधारण्याचा हा नामी मार्ग आहे. निंदकाचे घर असावे शेजारी,असं म्हटलं तर जातं पण प्रत्यक्ष ते अनुभवास आलं तर फारच त्रासदायक ठरतं.निंदा दोन प्रकारांनी होते.एक सुधारणा व्हावी म्हणून आणि दुसरा प्रकार म्हणजे सुधारणा पहावत नाहीत म्हणून.आपण मात्र सकारात्मकतेनेच ती स्विकारली पाहिजे. त्यामुळे चुका सुधारण्याची संधी मिळते.
नामचिंतनाने स्वतःमधील दोष कळतात.त्याचा त्याग करण्याचही बळ येतं.तुकोबाराय म्हणतात,माझे मज येती कळो अवगुण।काय करु मन अनावर।।आता आड उभा राहे नारायणा।दयासिंधुपणा साच करी।।
भगवंताचा गुणानुवाद,नामचिंतन कर्मशुद्ध प्रक्रियेचा मुख्य आणि सहजतेने करता येणारा मार्ग आहे.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/2ZBOunz

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *