
तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभरी कुटुंब पोशिले।काय हित केले सांग बापा।। झालास काबाडी फुकाचा चाकर। कुटुंब चालवण्याची शिक्षण पद्धती आपल्याकडे उपलब्ध नाही. ते मोठ्यांचा प्रपंच पाहुन शिकावं लागतं.भरपूर पैसा कमावल्याने कुटुंब आनंदाने चालते हा भ्रम खरा असता तर मग दुःख तिथं ठाण मांडुन बसलं नसतं.सुखवस्तू परिवारात निरोगी माणुस मिळणं कठीण होत चाललं आहे. पैशानं उपचार घेता येतील.पण शरीराची झालेली हानी नव्या आजारांना जन्म देणार हे रितसर आम्ही विसरत आहोत.
कुटुंबाचं पोषण ही जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की,जोखड आहे? काहीही म्हटलं तरी काम तर तेच करावं लागणार आहे. यात एकच शब्द मुख्य आहे,तो म्हणजे झालास काबाडी फुकाचा चाकर।क्षण एक घडी नाही सुख भोगावया।।आपण आपल्याच कर्माने चाकर झाल्याचे जो पर्यंत लक्षात येत नाही तो पर्यंत आनंद उपभोगता येत नाही.
तुम्ही स्वतःला पालक शब्द जोडुन घेतलात तर बाकीचे सर्व पाल्य म्हणजे पाळीव कक्षेत येतात.संस्कार शिदोरी सोडायला यात कुठे जागाच नाही.शेतात पाणी भरताना पाट फुटला की खोऱ्यानं माती ओढत रहायची आणि पाणी पुढच्या वाफ्यात जायची व्यवस्था करायची एवढच आपल्या हातात रहातं.कारण पाणी आपणच सोडलेलं असतं.सर्व पिकाला पाणी मिळावं आणि पिक चांगलं यावं हा चांगला विचार मनात असला तरी औषध फवारण्या चुकवल्या की हातात आलेलं पिक वाया जाण्याची शक्यता असते.
कुटुंब ही शेतीच आहे.माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलं आहे,का भुमिचे मार्दव।सांगे कोंभाची लवलव।नाना आचार गौरव।सुकुलीनाचे।।
जमीन चांगली सुपिक असेल तर पिकही चांगलच येणार.तसं कुळाचार शुद्ध असेल तर ते आचार त्या परिवारात दिसतातच.आता आपण जमीनीच्या भुमिकेत आहोत की कोंभाच्या भुमिकेत आहोत हे आधी तपासायला हवं.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/XI7OGUf