
व्यर्थ विषयाची मनात अभिलाषा निर्माण होणार नाही ते मनच कसलं ? विषयासक्ति हा प्रांपचिकाला चिकटलेला मसच आहे. मस म्हणजे शरीरावर असलेली काळी गाठ.त्याला जसं मरेपर्यंत अंगावर सांभाळावच लागतं तशीच ही विषयासक्ती आहे. ही प्रबळ झाली की मग त्याचं मुळ आम्हाला विनाशाकडे घेऊन जाते.सामाजिक अधःपतनास सुरुवात होते तेव्हा स्वांतरिक अधःपतन पुर्णत्वास गेलेले असते.परंतु या अवस्थेला पोहोचलेल्या व्यक्तीला याची सुतरामही कल्पना येत नाही.
विषयासुखाच्या सागरात बुडाल्याने विनाश दृष्टीस पडत नाही.यावर माऊलींनी फार सुंदर भाष्य केले आहे,
बापा विषाची मधुरता।
झणें आवडी उपजे चित्ता।
परी तो परिनाम विचारीतां।
प्राणु हरी।।११२
देखे इंद्रियी कामु असे।
तो लावी सुखदुराशे।
जैसा गळी मीनु अमिषें।
भुलविजे गा।।११३/३/ज्ञा.
ज्ञानेश्वरीत बचनाग या विषाचा उल्लेख आलेला आहे. हे विष चवीला गोड असते.परंतु हे जो प्राशन करील त्याला मृत्यू निश्चित येणार हा त्याचा परिणाम आहे. किंवा मासे पकडण्यासाठी गळाला अमिष लावले जाते,मग त्याला,गांडुळ,मांसाचा तुकडा असे माशांना आवडणारे पदार्थ लावले जातात.त्याला भुलुन मासा ते खाण्यासाठी येतो आणि प्राणास मुकतो हे आपणास ठाऊकच आहे.मात्र आपण गळाला लागतोय याची अनेकदा आपणास कल्पना येत नाही. कारण गळाला लावलेले आमिष.
एका कविने यावर सुंदर रचना केली आहे.गळाला लावलेले गांडुळ माशाला म्हणते,
मत आ मत आ।
मेरे लिये मत आ।
तु आता है मेरे लिए।
तो बाहर खडा है तेरे लिए।
तो बाहेर गळाचा दोर घेऊन बसलेला कोळी तुझी शिकार करण्यासाठी तयार आहे. पण मासा काही ऐकत नाही.
तसंच आमचं आहे. आम्हाला अनुभवी वयोवृद्ध अनेकदा सांगतात,बाबारे हे तु करु नकोस यात तुझे नुकसान होईल. पण आमच्यावर ती विषयासक्ती स्वार झालेली असते.स्वाध्यायाने यावर विजय मिळवता येईल. काय करावे आणि काय करु नये हा सत्सद्विवेक आत्मचिंतनाने जागृत होतो.पण तसा वारंवार प्रयत्न केला तरच ते शक्य आहे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3D5LrkY