
जुन्नर : राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी अनेकदा स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये वाद होत असल्याचे दिसत आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याने याचा प्रत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे हे भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर आले आणि शाब्दिक वाद झाला. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या पक्षातील नेत्यांमध्येच वाद झाल्याचे पाहून उपस्थितही काही वेळ आश्चर्याने पाहत होते. दरम्यान यावेळी काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.
काय घडला प्रकार ?
पुण्यातील जुन्नरमधील उंब्रज येथे मुख्यमंत्री रस्ता योजनेतील कामाचं श्रेय घेण्यावरून हा वाद रंगला. गावातील रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार बेनके उपस्थित राहणार होते. पण या कार्यक्रमासाठी शिवसेनेला मात्र आमंत्रण देण्यात आले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या नावे असणाऱ्या योजनेचे श्रेय राष्ट्रवादी घेत असल्याने माजी आमदार सोनवणे बेनकेंच्या आधी दाखल झाले. काही वेळाने बेनके आले असता दोघे आजुबाजूला बसले आणि त्यानंतर हा वाद सुरु झाला.
सोनवणे यांनी बेनके यांना श्रेय घेण्यासंबंधी विचारत असताना हाताला स्पर्श केला. यावरुन बेनके संतापले आणि “मला हात लावायचा नाही, हात खाली घ्या,” असे सुनावले. त्यानंतर बेनकेंनी उत्तर देत “हात लावायचा नाही म्हणजे काय? आपण फक्त स्पर्श केला असून पटत नसेल तर मग माझ्या बाजूला कशाला बसले?,” अशी विचारणा केली.
बेनके यांनी यावर तुम्ही फक्त चर्चा करा, असे सांगितले असता सोनवणे यांनी चर्चा करा म्हणता अन हाताचा मुद्दा घेऊन काय बसलात? असा संताप व्यक्त केला.
आता आमदारांमध्येच अशाप्रकारे हमरीतुमरी सुरु असल्याने उपस्थितही अवाक झाले होते. मात्र नंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. वाद मिटल्यानंतर पुन्हा दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करु लागले होते. पण यामुळे काही काळासाठी मात्र तणाव निर्माण झाला होता.
from https://ift.tt/31xTB94