तुकोबाराय म्हणतात,
साधुनी भुजंग धरतील हाती।
आणिके कापती देखोनिया॥
असाध्य ते साध्य करिता सायास।
कारण अभ्यास तुका म्हणे ॥
आपण काही मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.पण यश येत नाही असे वाटले की आपण मधुनच ते सोडून देतो.दह्यापासुन लोणी मिळवण्यासाठी घुसळण करावी लागते.पण लगेच लोणी मिळत नाही. त्यासाठी तो वेळ ठरलेला आहे. तेवढा वेळ घुसळण केली की आपोआप लोणी तयार होते. साप पकडणारांचे उदाहरण तुकोबाराय देतात.
काहीजण साप ही हाताने पकडतात. परंतु इतर लोकांना हे पाहून भीती वाटते. साप हाताने पकडण्याचे कौशल्य फक्त सतत सराव केल्यामुळेच प्राप्त होते. पुढे तुकोबाराय म्हणतात की, कोणतीही गोष्ट असाध्य नसून सातत्यपूर्ण अभ्यास केला तर ती साध्य होते.आपल्याला पाणी उकळण्यासाठी किती अग्नी द्यावा हे माहिती असते.किंवा पाण्याचे बर्फ करण्यासाठी किती वेळ ते फ्रिजमधे ठेवले पाहिजे हे माहीत आहे. पण कर्मफल संबंधाने तो कालावधी ठरवता येत नाही. त्यासाठी सातत्य हाच एकमेव मार्ग आहे.नुसत्या सातत्यानेही योग्य कर्मफल प्राप्त होणार नाही तर त्यासाठी त्यात नीटनेटकेपणाही असायला हवा.शिवाय प्रयत्न अभ्यासपूर्वक असले पाहिजेत.आळशी मनुष्याला इच्छित कर्मफल प्राप्त होत नाही. त्याचं उदाहरण देताना तुकोबाराय म्हणतात,
निवडावे खडे । तरी दळण वोजे घडे ॥
 नाही तरि नासोनि जाय। कारण आळस उरे हाय॥
निवडावे तण । सेती करावे राखण॥
तुका म्हणे नीत । न विचारिता नव्हे हित॥
धान्याचे पीठ करण्यासाठी दळण करावे लागते. तत्पूर्वी धान्यातील काडीकचरा खडे निवडून वेचावे लागतात जेणेकरून पीठ चांगले मिळते. पण आळस केला तर धान्यात काडीकचरा खडे राहून पीठ निकृष्ट दर्जाचे होते. तुकोबाराय पुढे शेतीचे उदाहरण देऊन म्हणतात की, पिक चांगले येण्यासाठी तण काढावे लागते. आळस हाच मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणूनच मनुष्याने नित्य जागरुक राहून वाईट,अहितकारक आळस बाजूला सारून स्वतःचे हित केले पाहिजे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/PAlBKaU

By News

Leave a Reply

Your email address will not be published.