
पारनेर :प्रतिनिधी
पारनेर शहरासाठी लवकरच राबविण्यात येणाया बहुचर्चित पाणी योजनेसाठी कुंभारवाडी येथे उभारण्यात येणाया पाण्याची टाकी, पंप हाऊस, क्लोरिनेशन सिस्टीम तसेच इतर सुविधांसाठी मा. नगरसेवक आनंदा औटी तसेच प्राथमिक शिक्षकांचे नेते संभाजीराव औटी यांनी आपल्या मालकीची जागा अवघ्या एक रूपयांच्या मोबदल्यात नगरपंचायतीच्या नावावर करून दिली. औटी बंधूंच्या या औदर्याचे पारनेर शहरात कौतुक करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर शहरास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. प्रत्येक निवडणूकांमध्ये पाण्याच्या प्रश्नाचा मुद्दा पुढे करण्यात येवून निवडणूका लढविण्यात येत होत्या. पाणीप्रश्न मात्र सुटत नव्हता. आमदार नीलेश लंके यांचा विधानसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर त्यांनी पारनेर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्याचा विडा उचलला होता. नगरपंचायतमध्ये सत्ता नसल्याने त्यांच्या या प्रयत्नांना मर्यादा येत होत्या. पाणी योजनेचे श्रेय आ. लंके यांना मिळू नये म्हणून पाणी योजनेचा प्रस्तावही दिला जात नव्हता. पुढे नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर आ. लंके यांनी या कामास गती देण्याचा निर्णय घेतला. योजनेचे सर्वेक्षण पुर्ण करून घेण्यात आले. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तालुक्यातील पिंपळनेर येथील कार्यक्रमात या महत्वाकांक्षी योजनेसाठी निधी मंजुर करण्याची घोषणा केली.
मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून ही योजना राबविण्यात येणार असून सुमारे शंभर कोटींचा खर्च या योजनेसाठी अपेक्षीत आहे. योजेनेसाठीचे पंप हाऊस तत्सम यंत्रणांसाठी ढवळपूरी व कुंभारवाडी येथे जागेची आवश्यकता होती. दोन्ही ठिकाणच्या जागा नगरपंचायतीच्या मालकीच्या नसल्याने प्रस्तावात तशी त्रुटी काढण्यात आली होती. ती दुर करण्यासाठी ढवळपूरी येथे जागा उपलब्ध करून घेतानाच कुंभारवाडी येथे आनंदा औटी तसेच संभाजी औटी यांच्या जागेची निवड करण्यात आली.
औटी बंधूंना जागेविषयी विचारणा केली असता शहराच्या पाणीयोजनेसाठी लागणाऱ्या जागेसाठी आम्ही कोणताही मोबदला घेणार नाही. एक रूपया घेवून नगरपंचयातीच्या नावावर जागा करून देवू अशी भुमिका औटी बंधूंनी घेतली. आमदार नीलेश लंके हे निःस्वार्थी भावनेतून मतदारसंघाबरोबरच राज्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांच्याच पुढाकारातून वर्षानुवर्षी रखडलेल्या पाणी याजेनेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शहरवासीयांना शाश्वत पाणी उपलब्ध होणार असल्याने आमचाही त्यात काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही कोणत्याही मोबदल्याशिवाय ही जागा नगरपंचायतीस हस्तांतरीत केल्याचे संभाजी औटी व आनंदा औटी यांनी सांगितले.
from https://ift.tt/L1mKIPq