
संपादक देविदास आबूज यांनी दिला माईंच्या आठवणींना उजाळा
देविदास आबूज
पारनेर : काल मंगळवारी रात्री झोपण्याच्या तयारीत असताना सोशल मीडियावर अनाथांची माय अर्थात सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी वाचली. क्षणभर विश्वासच बसेना. नक्की खात्री करून पाहिली घटना अगदी खरी होती. परमेश्वर इच्छेपुढे इलाजच नव्हता. माईंचे लाभलेले सानिध्य, विविध ठिकाणी झालेला प्रवास, कार्यक्रम, माझ्या घरचा मुक्काम अशा अनेक आठवणी रात्रभर डोळ्यासमोर तरळत राहिल्या.
पारनेर तालुक्यातील कार्यक्रमादरम्यान पंचवीस वर्षांपूर्वी माईंशी माझी ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर अगदी ऋणानुबंधात झाले. पारनेर तालुक्यात किंवा परिसरात येणार असल्या की मला हमखास निरोप ठरलेलाच ! तालुक्यातील अळकुटीच्या साईनाथ विद्यालयात, भाळवणीच्या महात्मा फुले विद्यालय,टाकळी ढोकेश्वरच्या अपंग केंद्रात, पारनेर महाविद्यालयात त्याचबरोबर अनेक ठिकाणी माईंचा सहवास लाभला.
दिवसभर चे कार्यक्रम आटोपल्यानंतर माई सारोळा अडवाई येथे माझ्या घरी मुक्कामी असायचा. खुडलेल्या हिरव्या मिरचीचे पिठलं हा माईंचा आवडता मेनू. माझी आई स्व. इंदुबाई स्वयंपाक करायला लागली की माईंनाही स्वस्थ बसवत नसायचे. माझ्या आईने कितीही विरोध केला तरी माई त्यांच्या हाताने लसूण,मिरच्या कापून माझ्या आईला मदत करायचा. अशाच दोन ,तीन रात्रीच्या मुक्कामानंतर माई सासवडला जायला निघाल्या माझ्या आईने नाश्त्याला पोहे केले. माईंनी पोहे खाण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या माझी लेकरं तिकडे उपाशी असतील मी कसे पोहे खाऊ अन् देविदास आज तू पोहे दिले उद्या कोण देईल? माईंचा हा चा प्रश्न अजूनही माझ्या कानात घुमतोय.
असेच एकदा माई घरी मुक्कामी होत्या. सकाळी उठल्यानंतर अचानक त्यांची तब्येत थोडी बिघडली. मी त्यांना घेऊन पारनेरला डॉ.आर.जी.सय्यद यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली.विषय नॉर्मल होता. डॉक्टरांनी माईंना ओळखले नव्हते. औषधाच्या चिठ्ठीवर लिहिण्यासाठी डॉक्टरांनी नाव विचारले. विनम्रपणे हात जोडत माई म्हणाल्या. नमस्कार.. मी सिंधुताई सपकाळ ! हे वाक्य ऐकताच सामाजिक भान असणारे सय्यद डॉक्टर ही आवक झाले. गप्पाटप्पा झाल्या,डॉक्टरांनी घरी नेऊन नाष्टा पाणी केले.
अलीकडच्या काही महिन्यांपूर्वी जामगावचे उद्योजक सुरेशशेठ धुरपते यांच्या मातोश्रींच्या वर्षश्राद्धाला माईंना आमंत्रित करायचे होते आणि ही जबाबदारी माझ्यावर होती. मोबाईलवर संपर्क झाला.कोरोनाची लाट कमी झाली तर मी नक्की येईल. तुझ्याकडे मुक्कामालाच थांबेल असा शब्द माईंनी मला दिला होता. मी मनातून खुश होतो परंतु कोरोना कमी न झाल्याने माईंना येता आले नाही ही सल माझ्या मनात कायमचीच राहून गेली. असो, नियतीपुढे विलाज नाही. माईंच्या आठवणी सदैव माझ्या मनात कायम राहतील. माईंच्या पवित्र स्मृतीस ‘पारनेर दर्शन’च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
from https://ift.tt/3FX5mFb