तुकोबाराय म्हणतात,
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देइ नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥२॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥३॥
तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥
अमृताच्या वेलीला अमृताचीच फळं लागावीत आणि त्या फळांमधून निघणारी बीजं अमृताचा वारसा चालवणारीच निघावीत, तसं संतांच्या संगतीचं आहे.
ज्याला स्वतःचं खरंखुरं कल्याण करायचं असेल, त्यानं आपली संगत मोठ्या विवेकानं निवडली पाहिजे. कठोर, निर्दय, संवेदनाहीन आणि स्वार्थी व्यक्तीच्या संगतीपासून दूर राहणं, हेच आपल्या हिताचं असतं. ज्यांच्या बोलण्यामधे ओलावा आहे, म्हणजेच करुणा आहे, अशा लोकांचीच संगत आपल्याला लाभावी, अशी तुकारामांची उत्कट इच्छा आहे.
उत्तम पदार्थांचं सेवन केलं असता, ते आपल्या कंठालाही शीतलता देतात आणि त्यांच्या सेवनामुळं शरीर पुष्ट होऊन त्याच्यावर उत्तम कांतीही येते. सज्जनांची संगत ही अशा उत्तम पक्वान्नांसारखी असते. ती सुखाचा गोडवाही देते आणि आपलं जीवन समृद्धही करते. चंदनाचा स्पर्श झाला असता त्याचा सुगंध आपल्या अंगालाही लागतो, त्याप्रमाणं सज्जनाच्या संगतीत आपलं जीवनही सद्गुणांच्या सुगंधानं गंधित होऊन जातं.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/fVl6JEL

By News

Leave a Reply

Your email address will not be published.