पारनेर : मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधूताई सपकाळ या ‘अनाथांच्या आई’ झाल्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभ्या केलेल्या कामाची राज्यासह राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली. सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा… पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. सिंधूताईंचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले. अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाशझोत…
वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधूताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही; परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला; परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधूताईंचा संघर्ष. बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या.
कधी रेल्वे स्टेशनवर राहिल्या, तर कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. भुकेलाच त्या आपली प्रेरणा मानत होत्या. स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि नंतर तो चांगलाच फुलला.
दरम्यान, सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, इचलकरंजीचा प्रतिष्ठित ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ इ. उल्लेखनीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना ‘आनंदमयी पुरस्कार’ही मिळाला आहे. पंजाबमधील लुधियानाच्या ‘सत्पाल मित्तल नॅशनल अॅवॉर्ड’च्याही त्या मानकरी आहेत. या पुरस्कारांसह इतर शेकडो पुरस्कार आणि सन्मानचिन्हे देऊन समाजातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

from https://ift.tt/3Hz1r1F

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *