
सतीश डोंगरे
शिरूर : छातीत दुखत असल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज अखेर दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अण्णांनी सर्व वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नुकतंच पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमधे भरती करण्यात आलं होतं. त्यांना ह्रदयासंबधी समस्येमुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्यावर एंजीओग्राफीसह आणखी काही तपासण्या करण्यात आल्या. यावेळी त्याच्या ह्रदयात छोटे ब्लॉकेज आढळून आले आहे. सुदैवाने अण्णांवर शस्त्रक्रियेची गरज नसून औषधांनी हे ब्लॉकेज ठिक करण्यात येणार असल्याच रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉकटर परवेझ ग्रांट यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अण्णांना आज दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर अण्णांनी डाॅ. परवेझ ग्रांट, डाॅ. मखळे, डाॅ. मुनोत आणि इतर सर्व डाॅक्टर्स, सिस्टर्स, सफाई करणाऱ्या मावशी, स्टाफ आणि आसीयू युनीटच्या सगळ्यांचे आभार मानले.
उपराष्ट्रपती मा. व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री मा. अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून आस्थेनं अण्णांची चौकशी केली.
तर दुसरीकडे फेसबुकवर आणि सोशल मिडीयावर अनेकांनी अण्णांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आज अण्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समजताच देशभरातील कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
अण्णांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी काल देशभरातून अण्णा हजारे यांच्या कार्यालयातील फोन खणखणत होते. शेवटी हजारे यांच्या कार्यालयातून अधिकृत पत्र काढून अण्णांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर कार्यकर्ते काहीसे शांत झाले.
from https://ift.tt/30ZDNLQ