
पुणे: राज्यातील मास्कबंदी उठवण्यात येणार, अशी चर्चा सध्या सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तशी चर्चा झाल्याचे वृत्त काहींनी दिले. मात्र, हे वृत्त धादांत खोटे आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी पु्ण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील मास्कबंदी उठवली जाणार असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.
यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, अशी चर्चाच झाली नाही. माध्यमांनी यासंदर्भात नीटपणे माहिती घेऊन बातमी द्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांसह आमचा आग्रह आहे. परदेशात इंग्लंडसारख्या देशांनी मास्क न वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांना लखलाभ आहे, मला त्यावर बोलायचं नाही. आपल्या राज्यात तशाप्रकारची चर्चाही नाही. तसा कोणता निर्णयही झालेला नाही. कृपा करुन लोकांमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करु नयेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
from https://bit.ly/3uf5z3l