
मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख काल (सोमवारी) थेट ईडीच्या कार्यालयात प्रकटले. त्यानंतर सुमारे तेरा तास त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्या नंतर रात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
काल सोमवार(दि. १ नोव्हेंबर)रोजी सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांना अखेर मंगळवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली. दरम्यान, रात्रभर अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयातच ठेवण्यात आले असून मंगळवारी सकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती ईडीचे सह संचालक सत्यव्रत कुमार यांनी दिली आहे.
अनिल देशमुख “या” कारणाने सापडले अडचणीत !
मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात अनिल देशमुख हे गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीच्या रडारवर होते. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीनं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती.
देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरे, कार्यालये व अन्य संस्थांवर ईडीनं अनेक वेळा धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, कोरोना, वय आणि आजारपणाचे कारण देत सुरुवातीला त्यांनी चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतरही ईडीने त्यांना चार वेळा समन्स बजावले. पण ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यावरून प्रचंड गदारोळ उडाला होता. माजी गृहमंत्रीच गायब असल्यामुळे राज्य सरकारचीही कोंडी झाली होती.
from Parner Darshan https://ift.tt/3ERHSAr