
सतीश डोंगरे
शिरूर : बैलगाडा शर्यती चालू झाल्यापासून खिलार जनावर बाजारात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले आहे. रांजणगाव गणपती येथील भाऊसाहेब बबनराव बत्ते या प्रसिद्ध गाडा मालकाने अवघ्या अठरा महिन्याचा खोंड तब्बल 11 लाख 11 हजार रूपये मोजून विकत घेतला आहे. आज दि.8 एप्रिल रोजी कारेगाव येथे हनुमान यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत हा खोंड आपली कसब दाखविणार आहे. त्यामुळे या बैलाचा खेळ पाहण्याची उत्सुकता परीसरातील तमाम बैलगाडा शौकीनांना लागून राहिली आहे.
सध्याच्या काळात खिलार जनावरांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. मजुरांच्या टंचाईमुळे शेतीमध्ये वाढलेले यांत्रिकीकरणासह विविध कारणांचा फटका बसल्यामुळे खिलार जनावरांची संख्या रोडावल्याचे दिसत आहे. मात्र न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यामुळे खिलार जनावरांना मागणी वाढली आहे. यामुळे खिलार जनावरांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. शिरूर तालुक्यातील चांडोह येथील युवा शेतकरी विशाल शिंदे यांनी आपल्या दावणीचा अवघ्या अठरा महिन्याचा खोंड तब्बल 11 लाख 11 हजार रुपयांना नुकताच विकला. रांजणगाव गणपती येथील प्रसिद्ध गाडा मालक भाऊसाहेब बबनराव बत्ते यांनी तो खरेदी केला.
पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित घाटात या खोंडाने बैलगाडा शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. त्यामुळे अनेक शर्यती गाजविलेला हा खोंड बत्ते यांच्या मनात बसला. संबंधित मालकाने या खोंडाची किंमत 15 लाखाच्या आसपास सांगितल्याने अखेर घासाघीस होऊन 11 लाख 11 हजार रूपयांना हा व्यवहार झाला. त्यानंतर बत्ते यांनी वाजत-गाजत हा बैल आपल्या घरी आणला. घरी आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या बैलाचे औक्षण केले. यावेळी परिसरातील अनेक बैलगाडा शौकीन व मालक हा बैल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खिलार जातीचा बाजी नावाचा हा खोंड अत्यंत देखणा आहे. अवघ्या अठरा महिन्यांत त्याची उंची जवळपास पाच फूट आहे. पांढरा शुभ्र रंग, अत्यंत आकर्षक शरीरयष्टी, निमुळती व टोकदार विशिष्ट आकारातील शिंगे, ऐटबाज वशिंड असा सर्वगुण संपन्न खिलार जातीतील हा खोंड अत्यंत काटक व चपळ आहे.
“या खोंडाच्या खरेदी व्यवहाराच्या वेळी मी स्वतः उपस्थित होतो. या परिसरातील अलिकडच्या काळातील हा सर्वात मोठ्या किंमतीचा बैलाचा व्यवहार असावा. मात्र या बैलाचा खेळ ही खरोखरच पहाण्याजोगा आहे. आज कारेगाव येथे हनुमान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीत या खोंडाची कमाल पहायला मिळणार आहे. त्याची उत्सुकता आम्हाला ही आहे.
तुळसीदासदादा दुंडे
अध्यक्ष, हनुमान बैलगाडा यात्रा कमिटी, कारेगाव ता. शिरुर
from https://ift.tt/HWILS79