पारनेर :न्यू आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ.अजय ठुबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर, उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक दिलीप ठुबे, उपस्थित होते.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुण्यमयी दे अक्षर वरदान या गीताने व कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेप्रसंगी बोलताना प्र- कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी म्हणाले, हे महाविद्यालय विद्यापीठाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. येथील प्रत्येक घटक उत्कृष्ट आहे अद्ययावत इमारत प्रयोगशाळा त्याचबरोबर शहरी भागातील महाविद्यालय पेक्षाही उत्कृष्ट असे येथील वातावरण आहे.येत्या पाच वर्षात आपणाला येथील मुलांसाठी काय करता येईल याचे चिंतन करून आपण शैक्षणिक आराखडा तयार करायला हवा. कारण पुढील चाळीस पन्नास वर्षांच्या कार्यकाळात आपल्याला कुठेही न थांबता भविष्याची चांगली वाटचाल करायची आहे.यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कोणत्या योजना आहेत याचा आपण सर्वांनी बारकाईने अभ्यास करायला हवा त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचे वाचन मुळापासून करायला हवे. तो संपूर्ण मसुदा पाहिला कारण शालेय शिक्षण विषयक धोरण माहिती असेल तरच आपण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील शिक्षण कसे असावे हे ठरवू शकतो. विद्यार्थी कसा घडवायचा आहे हे माहीत असेल तर त्यांना आपण पुढे घडू शकतो.

 

महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे शालेय शिक्षणाची असलेले नाते सद्यःस्थितीमध्ये तुटलेले दिसून येते. हे नाते पुन्हा जोडणे अत्यंत आवश्यक आहे ते पुढे म्हणाले की, सर्वसमावेशकता हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मुख्य आधार आहे. दर्जा म्हणजे केवळ भौतिक सुविधा नव्हे तर दर्जा म्हणजे साध्य आहे हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण इमारती कितीही अद्यावत असल्या तरी त्यामधून विद्यार्थी कसा घडून बाहेर पडणार आहे हे महत्त्वाचे आहे. जे शिकतो ते उपयुक्त असेल तर ती आहे कॉलिटी या शैक्षणिक धोरणात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे उत्तरदायित्व व परवडणारी क्षमता सर्व शिक्षण व्यवस्था समजून घेणे. म्हणजेच उत्तरदायित्व आणि परवडणारी क्षमता होय. नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश एका वाक्यात सांगायचं असेल तर तो म्हणजे समृद्ध माणूस घडविणे,उत्तम नागरिक घडविणे हवे, सर्व गुण संपन्न होणे कठीण आहे पण बहुगुण संपन्न होणे शक्य आहे. यासाठी ध्येय इच्छा व ज्ञान आवश्यक आहे. समृद्ध माणूस म्हणजे विवेक व समतोल विचारावर आधारित कृती. समाज व व्यक्ती बद्दल करुणा,आस्था व सहानुभूती असणे, धैर्य असणे, वैज्ञानिक, वाचणे, चारित्र्यसंपन्न असणे या सर्वांनी मिळून माणूस समृद्ध होतो. चारित्र्यसंपन्न असणे म्हणजे सुसंस्कृतता आहे. निर्व्यसनी असणे आहे. आणखी व्यापक अर्थ म्हणजे माझा देश या देशाचा इतिहास या बद्दल संपूर्ण माहिती असायला हवी. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक कळायला पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञानाने आपली प्रगती होऊ शकते. हा ठाम विश्वास असणे आज काळाची गरज आहे. आजचा अभ्यासक्रम क्रेडिट पॅटर्नवर आधारित आहे. क्रेडिट म्हणजे काय तर ज्ञानसंचय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा त्यांना किती ज्ञान मिळालं हे महत्त्वाचे आहे.

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येण्यामागील कारण म्हणजे बदल आवश्यक आहे व बदलल्याशिवाय पर्याय नाही. या धोरणात शिक्षणातील लवचिकता, आंतरविद्याशाखीय अभ्यास, सर्जनशील विचार, चिकित्सक विचार वृत्ती, एका घटकाचे संपूर्ण ज्ञान मिळाल्याशिवाय पुढे न जाता येणे, सातत्यपूर्ण मूल्यमापन, जीवनावश्यक कौशल्य यांचा समावेश आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या या विश्लेषणात बरोबरच त्यांनी असेही म्हटले की,आपण विद्यार्थ्यांना लिहायला शिकवतो,वाचायला शिकवतो पण पहायला शिकवत नाही हे पहायला शिकवणे आज गरजेचे आहे.
प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विज्ञान व तंत्रज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.जी.चासकर हे होते. ते म्हणाले की, या नव्या शैक्षणिक धोरणात एज्युकेशनला महत्त्व दिलेले आहे.म्हणजेच शिक्षण स्वातंत्र्य एखाद्या विद्याशाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्याशाखेतील विषयासंबंधी एखादा घटक समजावून घ्यायचा असेल तर तो ते शिकू शकतो. विज्ञानाचा विद्यार्थी एखादा कला शाखेतील विषय घेऊ शकतो.तर कला शाखेतील एखादा विद्यार्थी वाणिज्य शाखेतील एखादा विषय अभ्यासण्यासाठी घेऊ शकतो. ही लवचिकता आणि शिक्षण स्वातंत्र्य या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेले आहे.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, एकीकडे शिक्षणातील स्वातंत्र्य दिले पण त्यावर नियंत्रण मात्र सरकारचे ठेवले गेले आहे हा विरोधाभास आहे. आपले विद्यार्थी तर बाहेरच्या देशात जाऊन शिक्षण घेत असतील तर आपण काय करतो आहोत हा विचार देखील आज व्हायला हवा.
या कार्यशाळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ.अजय ठुबे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. अतिथींचा परिचय उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. दिलीप ठुबे यांनी करून दिला. आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सहसमन्वयक प्रा. वीरेंद्र धनशेट्टी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया लहारे, डॉ.हरेश शेळके यांनी केले.

from https://ift.tt/R8aoxZQ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.