विज्ञानमय कोश आम्हाला स्वत्वाची जाणीव करुन देतो.मीपणाचा तोरा मिरवण्याची एकही संधी सोडायची नाही हा हेकेखोरपणा लवकरच पक्का होतो.याचं मुख्य कारण हे ही आहे की आपल्या अवतीभवतीचा कंपु.आपली भलावण करणारा कंपु तयार झाला की आपण कुणीतरी मसिहा असल्यासारखे अवसान मीपण धारण करते.मग आपला मोठेपणा होत असताना दुसऱ्याचं गुणगान सहन होतच नाही.
निंदानालस्ती करण्याची प्रवृत्ती तयार होते ती आपल्या वाट्याला न आलेल्या यशामुळे.आपल्या वरचढ कोणीही यशस्वी झाला की मीपणाला धक्का लागतो.आलेले अपयश आपल्या कर्तृत्वाच्या कमतरतेचा भाग असतो.पण मन हे मानु देत नाही.माऊली म्हणतात,
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेईजे पिळुनी । तया नाम अमृत ठेवुनी । जैसें अमर होणें ॥ अ.९/४९८
अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल, तो पिळून घ्य़ावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून (त्याच्या सेवनाने) ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी
तेवीं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥

त्याप्रमाणे विषयांमधे जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दु:खच आहे. परंतु काय करावे ? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्यावाचून त्यांचे चालतच नाही.
म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं । कैंची सुखनिद्रा अंथरुणीं । इंगळांच्या ॥ ५०१ ॥
एवढ्याकरता या मृत्युलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय ? निखारे असणार्‍या अंथरुणावर आनंदाने झोप कोठून येणार ?
जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं । दुःख लेऊनि सुखाची आंगीं । सळित जगातें ॥ ५०२ ॥
ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्यासाठीच (सूर्याचा) उदय होत असतो जेथे दु:ख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळित आहे.
सज्जनहो हा सगळा विषयसुखाचा परिपाक आहे. शेवट गोड होणारच नाही. यासाठी या विज्ञानमय कोशातच दुरुस्ती शक्य आहे. त्यासाठी मागील तीन कोशांची शुद्धी जपता आली तर विज्ञानमय कोश शुद्ध होणे फार अवघड नाही. मी म्हणजे शरीर नाही ही जाणीव जगण्याचा आनंद प्राप्त करुन देण्यास पर्याप्त आहे.विषयसुखाची गोडी त्यामुळे आपोआप कमी होत जाईल.पण यात सातत्य सर्वात महत्त्वाचं आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3iuOcxL

By News

Leave a Reply

Your email address will not be published.