आपली दिनचर्या कशी असावी?यावर आपण विचार करत असाल तर आपण सावध आयुष्य जगत आहात.पहाटे उठुन योगा,व्यायाम केलाच पाहिजे. ध्यानाला बसण्याची सवय लावावी लागेल.अन्नमयकोश पवित्र करण्यासाठी हे आवश्यक आहे. स्नानादीकर्म आटोपल्यावर पहिल्यांदा तोंड कशासाठी उघडता?
चहा,चहाखारी,चहाबिस्कीटं,चहाचपाती असं काही असेल तर याचे दुष्परिणाम तुम्हाला लवकरच भोगावे लागतील.चहा अविभाज्य घटक झाला आहे.मलाही चहा खूप प्रिय आहे.पण तो सोडणं सोपं नाही. रिकाम्या पोटात दुधाचा चहा जाणं भयंकर आहे.पण विकार होत नाही तोपर्यंत तो चांगलाच वाटतो.तो सुटत नसेल तर मी करत असलेला प्रयोग अमलात आणा.तो म्हणजे सकाळीच जेवण करायचं.जेवण नेहमी भुक शिल्लक ठेवून करायचं आहे. कितीही आवडीचा पदार्थ रोजच्या मर्यादेतच खायचा आहे. शिवाय ठराविक वेळेलाच खायचं आहे. इतर वेळी पोटात काही जाऊ द्यायचं नाही.एखाद्या वेळी पैपाहुण्यांमुळे वेळ बिघडली तर त्याचाही फार बाऊ करायचा नाही.
आपलं पोट सतत रिकामं वाटलं पाहिजे. रात्रीचं जेवण लवकर म्हणजे आठ,नऊच्या आतच व्हायला हवं ते ही सकाळच्या जेवणापेक्षा कमी.अति तेलकट,तिखट,खारट,आंबट पदार्थ टाळायचे आहेत.दहा वाजेपर्यंत झोपण्याची सवय करुन घ्या.पदार्थांमधली रुची हळूहळू कमी करायची आहे.आपण जगण्यासाठी खात आहोत हे सतत लक्षात ठेवायचं आहे. जे खाल ते अत्यंत प्रसन्नपणे खा.मग शिळी भाकरी सुद्धा पोषणच करणार.अशी दिनचर्या आपण ठेवलीत तर पहाटे आपोआप जाग येईल. मग ते शरीर ध्यान साधनेसाठी उत्तम असेल.आणि त्याचं तेज महिनाभरातच तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागेल.भुक ताब्यात आली की अन्नमय कोशावर विजय मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत.
आपण आपल्या आईला,पत्नीला जेवणाच्या वेळी हे विचारताच,आज काय भाजी केली आहे? ते आजपासून विचारणं बंद करा.समोर येईल ते अन्नच असणार असं पक्क करा.नावडीचाही पदार्थ आवडीने खाण्याची सवय लागली की कोशातुन बाहेर पडणं सुरू होईल.अन्न जगण्याचं माध्यम आहे हे एकदा मनात ठसलं की आवडीनिवडी गळुन पडतात.पोट रिकामं रहायला सुरू झालं की मग पहा ध्यान तुम्हाला किती शक्ती प्रदान करतं.हे अनुभवावं लागेल.आता आपण पुढच्या भागात प्राणमय कोशावर चिंतन करु.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/P6jMy1u

By News

Leave a Reply

Your email address will not be published.