पारनेर:- सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम प्रत्येक गावातील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायट्यांचे आहे. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्यास अनेकदा निदर्शनास आले आहे. तालुक्यातील पाडळी रांजणगाव मधील सोसायटीमध्ये चेअरमन ,संचालक आणि सचिवांनी कार्यक्षेत्रामध्ये एक गुंठा जमीन नावावर नसतानाही काहींना सभासद करून घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांना कर्जसुद्धा वाटप केले गेले आहे. विशेष म्हणजे त्यांचे मतदार याद्यांमध्ये सुद्धा नाव आहे. या बाबत गोरख नारायण उबाळे यांनी हरकत घेतली आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी निबंधकांकडे सादर केले आहे.
विविध विकास कार्यकारी सेवा सोसायट्या या त्या गावच्या आर्थिक कणा असतात. एकीकडे सहकार अडचणीत असताना दुसरीकडे या सहकारी सोसायट्यांमध्ये सुद्धा मोठे गैरप्रकार घडत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा अनेकदा येत आहेत. दरम्यान या सोसायट्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याला पारनेर तालुका सुद्धा अपवाद नाही. काही गावांमधील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटींच्या निवडणूका पार पडल्या आहेत. तर काही गावांमधील सोसायट्यांच्या निवडणुका होणे बाकी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रमाणे या निवडणुकांना सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व असते. ग्रामपंचायती इतकीच गाव पातळीवर चुरस निर्माण होते . या ठिकाणी आपले पारडे जड असावे. किंवा आपल्या पॅनल चे संचालक जास्तीत जास्त निवडून यावेत यासाठी तीव्र स्पर्धा सुरू असते. पाडळी रांजणगाव येथील सहकारी सोसायटीची निवडणूक सुद्धा येऊ घातली आहे. यामध्ये हद्दीत एकही गुंठा जमीन नावावर नसताना जवळपास 27 जणांना सोसायटीने सभासद करून घेतले असल्याचा आरोप येथील युवा कार्यकर्ते गोरख नारायण उबाळे यांनी केला आहे.
यासंदर्भात आपण तलाठयांकडून माहिती घेतली असता. संबंधितांच्या नावावर पाडळी रांजणगाव या ठिकाणी एकही गुंठा जमीन नाही. असे असताना चेअरमन संचालक आणि सचिव यांनी संगनमताने संबंधितांना चक्क कर्जवाटप केले आहे. या सर्वांची मतदार यादीमध्ये नावे आहेत. संबंधितांना बेकायदेशीर लाभ देत असताना त्यांना मतदानाचा सुद्धा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारांची नावे यादीतून वगळावेत. त्यांच्याकडून कर्ज वसुली करून या प्रकरणाबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उबाळे यांनी सहाय्यक निबंधक सहकार यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील सर्व पुरावे यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही केले जाईल अशी ग्वाही सहाय्यक निबंधक यांच्याकडून देण्यात आली.

पाडळी रांजणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने आणखी एक अजब कारभार केल्याचा आरोप हरकतदाराने केला आहे. मतदार यादीमधील 40 पेक्षा जास्त सभासदांच्या नावावर 2021ला जमिनीची नोंद करण्यात आली आहे. महसूल दरबारीत याबाबत सर्व पुरावे आहेत. मात्र सोसायटीने या सर्वांना दोन वर्षापूर्वीच कर्ज देऊन मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप गोरख उबाळे यांनी केला आहे. सभासद झाल्यावर दोन वर्षाने मतदानाचा अधिकार येतो. या सर्व दृष्टिकोनातून चेअरमन आणि सचिव व काही संचालकांनी संगणमत करून अशाप्रकारे मतदार वाढवले आहेत.

ज्यांच्या नावावर जमिनी नसतानाही त्यांचे बोगस उतारे सोसायटी मध्ये सादर करण्यात आले. आणि त्या माध्यमातून बेकायदेशीर सभासद अनेकांना करण्यात आले. त्याच वर कर्ज देऊन त्यांना मतदानासाठी पात्र ठरवण्यासाठी पडद्याआडून सूत्र हलवण्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. संबंधित बोगस उताऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी तर्फे पाडळी रांजणगाव येथे ज्यांच्या नावावर क्षेत्र आहे. त्याचबरोबर ते सोसायटीचे सभासद सुद्धा होते. मात्र राजकीय हेतूने बऱ्याच जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. याबाबत सुद्धा आश्चर्य व्यक्त करण्यात आले असून. त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करून घेण्याची मागणी करण्यात आले आहे.

from https://ift.tt/Mig0ODo

By News

Leave a Reply

Your email address will not be published.