स्वार्थ नावाचा दुर्गुण जन्म झाला की लगेचच चिकटतो.तेव्हा तो गरजेचा असतोच.अगदी कुत्र्या मांजराची पिलं सुद्धा जन्म झाला की लगेचच आईकडे दूध पिण्यासाठी धावतात.आपणही त्याला अपवाद नाही. हा प्रत्येक जीवाला मिळालेला उपजत गुण आहे.जगण्यासाठी केलेली खटपट जीवानुकुल आहे.जगण्यासाठी जे जे करावं लागेल ते समर्थनीय आहे.पण साठवण करण्याची इच्छा अगदी दुसऱ्याचं जीवन धोक्यात आणण्यापर्यंतचा प्रवास पार करुन पलीकडे गेलेली आहे.
या सगळ्या प्रखर इच्छेने आम्ही शांतीपासुन खूप दुर गेलो आहोत.त्यावर विचार करण्याचीही उसंत नाही.पण जसं सफरचंद सुरीवर पडलं काय किंवा सुरी सफरचंदावर पडली काय, परिणाम एकच आहे.आपण कसंही वागलो,जगलो तरी इतरांचं नुकसान नाहीच.भोगावं तर आपल्यालाच लागणार आहे. कोणत्या सुखाच्या शोधात आम्ही निघालोय?गळक्या माठाची तहान भागणारच कशी?साठल्याचा आभास होणार पण ते साठून रहाणारच नाही.
आम्ही आमच्या इच्छा रुपी भांड्याला अनेक आकांक्षेची भोकं पाडली आहेत.मग सुख नावाचा अनमोल दागिना खरेदी करण्याचा प्रयत्न किती हसवा आणि फसवा आहे ना?
तुकोबाराय म्हणतात,
शांतीपरतें नाहीं सुख ।
 येर अवघें ची दुःख ॥१॥
ती शांती मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं तरी ते मिळायला तयार नाही. महाराज म्हणतात, सर्वात मोठं सुख म्हणजे शांती आहे.म्हणवूनी शांति धरा।
उतराल पैल तीरा॥
जीवन नौका आनंदाने पार करायची असेल तर शांती धारण केली पाहिजे. जिथं शांती नाही तिथं काय असेल?अहो जिथं अंधार आहे म्हणजे प्रकाश गैरहजर आहे हे सांगायची गरज आहे का?
शांती गेली की खाली शिल्लक जे रहाते ते काम,क्रोध. ते त्यांचे काम बरोबर करतात.विकारांनी आधी व्याधी न जडतील तरच नवल.व्याधीग्रस्त मनुष्य शांतीला पारखा होणारच.हे सारं टाळण्यासाठी लहानपण देगा देवा हा एकच महामंत्र आहे. लहान होण्याचा साधा प्रयत्न सुद्धा अमोलिक आनंद देऊ शकतो,शांती प्रदान करु शकतो.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3KwOxU6

By News

Leave a Reply

Your email address will not be published.