श्वासोच्छ्वास चालू आहे तोपर्यंत. एकदा तरी देव पहावा.तुम्ही म्हणालं तो कुणाला दिसला आहे का?आणि कशासाठी पहायचा?आताही तो न पहाता चाललयच ना सगळं?आपल्याला माणसं ओळखता येत नाहीत,देव काय ओळखणार?
आपण प्रत्येकजन देव पहातो आणि देवातच रहातो पण योग्य मार्गदर्शन नसल्याने त्याची ओळख होत नाही. हे अज्ञान आम्हाला चिकटलय याची पुसटशी सुद्धा कल्पना अनेकांना शेवटच्या घटकेपर्यंत होत नाही.मुर्खांनी देवाला जादुने वेढलं आणि ते कसे मुर्ख आहेत हे सांगण्यासाठी विद्वानांनी कंबर कसली.मुळ देव काय आहे हे संतांनी सांगुनही तर्कवादाला तत्वदर्शी स्थान मिळत आहे हे मोठं दुर्दैवी आहे.

तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करोनि घ्यावा।तेणे विणं जीवा सुख नोहे।।
देवाची शोधाशोध म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असच आहे.आपलाच देव झाला पाहिजे असं महाराज म्हणतात आणि स्वतः त्यांनी ते अनुभवलही.देवची होऊनिया ठेलो असं म्हणताहेत तुकोबाराय. कठोर परिश्रमाने कार्य सिद्धीस जाते हे आपण जाणत असुनही कष्ट न करता इच्छित कर्म फळास यावे,देवाने काही चमत्कार करुन माझं दुःख नाहिसं करावं,पुजापाठाने माझ्या प्रापंचिक अडचणी संपाव्यात हा मानस आहेच.

देव पहाता का येत नाही?त्यामागेही हेच कारण आहे की श्रद्धा सात्विकतेने जपली जात नाही.नवसे पुत्र होती।तर हवा कशाला पती।। हे प्रबोधन तुकोबारायांनी केले आहेच पण त्याचं निरुपण करणं म्हणजे दुकानदारी बंद करण्यासारखे होईल ना?नवसाला पावणारा देव नवस करणाराला पावतो की नाही यापेक्षा संबंधीतांना तो पावतोच.पण आपण या गुंतागुंतीत पडु नये.इतर चर्चा भक्तीपासुन दुर घेऊन जातात.
तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।करावा विठ्ठल जीवभावे।। हे ज्याला समजेल तो,मी देव पाहिला नाही किंवा मी देवात रहात नाही असं म्हणणार नाही.

बौद्धिक क्षमता ही ओळख होण्यासाठी गरजेची आहे. अशिक्षीत,कमी शिकलेली माणसं निर्बुद्ध नसतात.त्यांना लगेच लहान होता येतं म्हणून अनेक कठीण गोष्टींचं आकलनही सहज होतं. जीवाला सुख प्राप्त करुन देणं ही आपलीच म्हणजे जीवाचीच जबाबदारी आहे.पण योग्य मार्गदर्शन झालं नाही की मग समज सिद्धांतात परावर्तीत होतात.मग ते खोडणं ब्रम्हदेवालाही अशक्य आहे.
देव पहाण्याचा मार्ग त्यागातून जातो हे समजलं तरी आपण त्या अवस्थेत लवकर जाऊ शकु.जीवाची हौस करण्याची सवय या चिरसुखापासुन दुर घेऊन जाते.जीवाला आत्मज्ञान होणं म्हणजे देवरुप होणं आहे.कारण त्यानंतर पापबुद्धि काम करत नाही, कुणाचं अहित करण्यास मन धजावत नाही.हेच स्वतःला स्वतःचं झालेलं देवदर्शन आहे.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/3CTbV9X

By News

Leave a Reply

Your email address will not be published.