एसटीने प्रवास करताना शेजारी बसलेल्या प्रवाशाशी टाईमपास म्हणून गप्पांना सुरुवात केली.ते दवाखान्यात पित्ताची औषधे घेण्यासाठी आले होते. बरीच औषधे पिशवीत होती. मला त्यांनी दाखवली. मी ही प्रत्येक गोळ्यांची स्ट्रिप बारकाईने पाहिली;अगदी डॉक्टर असल्यासारखे. त्यालाही बरं वाटलं.पण माझ्यातला डॉक्टर जागा झाला होता.
मी त्यांना सल्ला द्यायला सुरुवात केली.तुम्ही सकाळी गरम पाणी घ्यायला सुरुवात करा,जेवणानंतर वज्रासनात बसा,रोज एकतरी आवळा खा.पहाटे उठायला सुरुवात करा.मधेच तो म्हणाला,”अहो माझं जरा ऐकताय का?”मी म्हटलं काय ऐकायचय?एवढी औषधं तुम्ही घेताय कसं आयुष्य कडेला लागणार?
मी तुम्हाला काही बाबा रामदेवांनी सांगितलेली योगासनं सांगतो,कपालभाती करा,गावरान तुप जेवनात असुद्या.बराच वेळ सल्ला दिला.कंटक्टरने बेल दिली तसा तो उठला म्हटला,”साहेब स्टॉफ आला माझा. ह्या गोळ्या माझ्या नायी बरका!ज्याचा हायेत त्यो मोरच्या शिटावर बसलाय. मला कायबी प्रोब्लेम नाय.येऊका आता!”
मी इकडे तिकडे पाहिलं दोनचार जण ऐकत होते बहुतेक. माझा झालेला पोपट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.मी मनात विचार करु लागलो,एवढे सल्ले द्यायची गरज होती का?बरं या सल्ल्यापैकी आपण किती अमलात आणतोय ?
असंच होतं बराचवेळा.तुमचे अनुभव याहून वेगळे असतील पण माणसाचा तो स्वभाव आहे हे खरं आहे. एकजन तंबाखू मळता मळता सांगत होता,रोज दोन खारका,बदाम खातो मी न चुकता.काय उपयोगाचं? एकजन गुढगेदुखीवरील उपचार सांगत होता.म्हटलं आपला याबाबत अनुभव ? म्हटला,पुढच्याला फरक पडला तर मी करून पहातो.आता काय म्हणावं या गिनीपिग ट्रिटमेंटला?
माणुस दुसऱ्यासाठी एक उत्तम सल्लागार असतो.पण स्वतःसाठी?अनुभव नसलेले सल्ले देताना आपण आपली हुशारी तपासायला हवी.पण मन सज्जन असण्याची वेळ साधता आली पाहिजे.
स्वतःवर हसण्यातही एक वेगळीच मजा आहे.चुकांवर क्षमा मागता येणं हा श्रेष्ठ पुरूषार्थ आहे.तो सहज प्राप्त होत नाही. ती एक साधनाच आहे.मी त्या वाटेवरचा वाटसरू आहे. शिकतो आहे.हे खूप सुंदर आहे.हा माझा सल्ला नाही बरका!
रामकृष्णहरी

from https://ift.tt/i5FQlNG

By News

Leave a Reply

Your email address will not be published.