यंदा दिवाळीनिमित्त ३-४ दिवस कुटुंबासोबत एकत्र राहून दिवाळी सण साजरा करण्याचा योग आला. सामाजिक जबाबदाऱ्या व इतर कर्तव्यातून थोडी उसंत घेत ६ महिन्यांचा झालेला माझा नातू अगस्त्य, साईशा, विवान यांच्यासोबत मनसोक्त मौज केली, सर्व कुटुंबाला घेऊन कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले.
मला आजही आठवते २०१० मध्ये गावभेट दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे गेलो असता नेमकं मंदिरामध्ये देवदर्शन घेत असतानाच मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधून मोठा मुलगा अक्षय यास मुलगी झाल्याचा फोन आला आणि मी आजोबा झालो. माझी नात ‘साईशा’चा जन्मदिवस व संपूर्ण कुटुंबासोबत निमगाव खंडोबाचे काल-परवा घेतलेले दर्शन योगायोगाने ११ वर्षांनी एकाच तारखेला जुळून आले होते. त्यामुळे या देवदर्शनावेळी त्यावेळच्या आठवणी ताज्या झाल्या अनं मन प्रसन्न झाले.
सामाजिक जीवनात जनतेने मोठ्या विश्वासाने सोपविलेली जबाबदारी निस्वार्थपणे पार पडताना कुटुंबासोबत एकत्र येण्याचा व स्वतःच्या आवडी-निवडी जपण्याचा वेळ क्वचितच मिळतो. मात्र या मोजक्या क्षणांनीही मन तजेलदार होते नव्याने काम करण्याचा उत्साह संपूर्ण शरीरात संचारतो. कुटुंबासोबत अनुभवलेले मोजके क्षण हेच माझं ‘टॉनिक’ आहे. याचा मी अनेकदा अनुभव घेतलाय. लॉकडाऊनचा सदुपयोग करून दररोज १७-१८ किलोमीटर चालण्याची लागलेली सवय, अस्सल घरगुती जेवण यामुळे मी दिवसभर ‘फुल ऑन एनर्जी’त असतो.
डायनालॉग इंडिया लिमिटेड कंपनीच्या स्थापनेपासून मी गेली ४० वर्ष न चुकता लक्ष्मीपूजनला कंपनीत असतो. खासदारकीची माळ गळ्यात पडल्यापासून कंपनीकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता, मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कंपनीत माझा सर्व सहकारी स्टाफ एकत्र येत असल्याने यानिमित्ताने एकाच वेळी सर्वांना भेटण्याचा योग जुळून येतो. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री मुंबईला रवाना व्हायचं, दुसऱ्या दिवशी पूजा आटोपून परत गावी लांडेवाडीला यायचं हा माझा गेल्या १७-१८ वर्षांपासूनचा जणू नित्यक्रमच झाला आहे.
या मातीतल्या लोकांनी मला आजपर्यंत भरभरून प्रेम दिले आहे. त्याची उतराई होणे शक्य नाही. त्यामुळेच केवळ कुटुंबात न रमता लोकसेवेला कायम प्राधान्य दिले आहे. जनसेवा करीत असताना जनतेसोबत घालवलेला वेळ मला सतत ऊर्जा देत असतो. सक्रिय राजकारणात आल्यापासून जनसेवक हा एकमेव रोल निभावत असल्यामुळे मानसिक ताण हा कधी जाणवलाच नाही.
कोरोनाच्या संकट काळात अनेकांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न केला. गेली दीड-दोन वर्षे ‘न भूतो न भविष्यती’ असा कठीण काळ भोगणाऱ्या लोकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या नवीन आव्हानांना तोंड देताना माझ्याकडून शक्य ते सहकार्य करण्याचा यापुढेही निश्चितच प्रयत्न राहील हे मात्र नक्की !

from Parner Darshan https://ift.tt/3kkRATU

By News

Leave a Reply

Your email address will not be published.